राज्यात आताच कोरोना कसा वाढला? मनसेने व्यक्त केली शंका …

मुंबई :- गेल्या काही दिवसांत राज्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढते आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी रविवारी जनतेला संबोधित करत खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, या मुद्द्यावर शंका व्यक्त करत मनसेचे (MNS) नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी सरकारला लॉकडाऊनची भीती दाखवू नका, असा इशारा दिला.

संदीप देशपांडे यांनी ट्विट केले – सावधान सध्या कोरोनाचा नवीन स्ट्रेन आला आहे, त्याचे नाव विधिमंडळ अधिवेशन कोरोना असे आहे. जो शरीरावर कमी पण स्वातंत्र्यावर अधिक परिणाम करतो. या आरोपानंतर अनेक मविआ समर्थक मला ट्रोल करतील, पण जे सत्य आहे ते बोलणारच.

देशपांडे म्हणालेत, राज्यात कोरोनाचे असे कुठले आकडे वाढले आहेत हा प्रश्न आहे. कृपया जनतेला भीती घालू नका. विधिमंडळाचे अधिवेशन घ्यायचे नसेल तर नका घेऊ. अध्यक्षांची निवड करायची नसेल तर नका करू. पण लोकांना भीती कशाला घालता? सध्या राष्ट्रवादीच्याच मंत्र्यांना कोरोना कसा काय होतो?

दिल्लीत शेतकऱ्यांचे मोठं आंदोलन सुरू आहे. मात्र तिकडे कोरोना नाही! अमरावतीत कोरोनाच्या जास्त टेस्ट घ्यायच्या आणि कोरोना वाढल्याचे सांगायचे. गेल्या चार महिन्यात राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. पेट्रोल दरवाढीवर आंदोलन झाले तेव्हा कोरोना पसरला नाही. बसमध्ये चेंगरून लोक प्रवास करताहेत, तेव्हा कोरोना कसा काय नाही झाला? अधिवेशनाच्याच काळात कोरोनाची साठी का पसरते, अशी शंका देशपांडे यांनी उपस्थित केली.

गेल्या काही दिवसांत कोरोनाचे रुग्ण वाढत सरकारने राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. आठ दिवस परिस्थितीवर लक्ष ठेवून लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी काल जनतेला दिली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER