राष्ट्रीय सुरक्षा हा मुद्दा कसा होऊ शकत नाही?- पंतप्रधान मोदी

राष्ट्रीय सुरक्षा हा मुद्दा कसा होऊ शकत नाही

पालिगंज (बिहार) : केवळ भाजप सरकारने अमलात आणलेल्या धोरणामुळेच दहशतवाद संपुष्टात आणणे शक्य झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे सांगितले. राष्ट्रीय सुरक्षा हा केवळ निवडणूक मुद्दा असल्याच्या विरोधकांच्या आरोपाची त्यांनी खिल्लीही उडवली. मोदी म्हणाले, ‘महामिलावटी’ म्हणतात की, राष्ट्रीय सुरक्षा हा मुद्दाच नाही. हे कसे होऊ शकते? दहशतवादी हल्ल्यात अनेक सामान्य लोकांचे जीव जात आहेत. हल्लेखोरांना आम्ही त्यांच्या लपण्याच्या ठिकाणावर जाऊन संपविल्याचे सांगताना मोदींनी बालाकोट हवाईहल्ल्याचा संदर्भही दिला.

ही बातमी पण वाचा : पवारांना करायचे आहे सुप्रियाला मुख्यमंत्री

येथील पाटलीपुत्र लोकसभा मतदारसंघात एका प्रचार सभेत पंतप्रधान बोलत होते. मतदारांना भावनात्मक आवाहन करताना मोदी म्हणाले, निवडणुकीच्या काळातील ही माझी शेवटची सभा असेल; परंतु मी माझ्या विकास योजनांसह तुमच्यात नव्या कार्यकाळात परत येईन. तुमच्या प्रेमामुळेच माझ्यात विजयाचा आत्मविश्वास निर्माण झाल्याचे मोदी म्हणाले. शेवटच्या टप्प्यात एका चांगल्या विजयाची खात्री द्या, असेही ते म्हणाले.

बिहारमधील लालूप्रसाद यादव यांच्या राजद आघाडीतील घटक पक्ष काँग्रेसचे नाव न घेता टीका करत मोदी म्हणाले, जातीचा आधार घेत सत्ता मिळवतात आणि नंतर आपल्याच कुटुंबातील लोकांना ते वाढविण्याचे काम करतात. असे करताना कार्यकर्त्यांच्या योगदानाला विसरून जातात. राजदच्या कार्यकाळातील राज्यातील गुन्हेगारीवरही त्यांनी टीका केली.