ब्रेकडान्सिंग कसे पोहोचले ऑलिम्पिकमध्ये?

Breakdancing - Paris 2024

ब्रेकडान्सिंगचा (Breakdancing) वा ब्रेकिंगचा पॅरिस ऑलिम्पिक 2024 (Paris Olympic 2024) मध्ये समावेश झाल्याबद्दल अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. हा ऑलिम्पिक पदकाच्या योग्यतेचा क्रीडाप्रकार कसा होऊ शकतो असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्याचवेळी ब्रेकडान्सिंगच्या दिवान्यांचा उत्साह दुणावला आहे. जगभरातील आघाडीच्या अ‍ॅथलीटसोबत आपली वर्णी लागणार असल्याबद्दल बी गर्ल्स आणि बी बॉईज (या नावाने ब्रेकडान्सर्स ओळखले जातात) आनंदात आहेत.

खरं म्हणजे हा नृत्याचा एक प्रकार पण तो ऑलिम्पिकमध्ये कसा पोहोचला? तर 2016 मध्येच ही कल्पना पुढे आली. वर्ल्ड डान्स स्पोर्ट फेडरेशनने युवा ऑलिम्पिकमध्ये हा खेळ येऊ शकतो असा विचार मांडला आणि 2018 च्या ब्युनोस आयर्स युवा ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदा ब्रेकडान्सिंगच्या स्पर्धा झाल्या. युवावर्गातून त्याला प्रचंड प्रतिसाद लाभला. सोशल मीडिया व ऑलिम्पिक चॅनलवरही त्याला भरपूर प्रेक्षक लाभले. त्याचवेळी ब्रेकडान्सिंगच्या ऑलिम्पिकमध्ये समावेशाचे संकेत मिळाले होते. पॅरिस ऑलिम्पिकच्या आयोजकांनी वर्ल्ड डान्स स्पोर्ट फेडरेशनला ब्रेकिंगच्या समावेशाची तयारी दर्शवली होती आणि आता त्याची अधिकृत घोषणा झाली आहे.

ब्रेकडान्सिंगच्या स्पर्धा बॅटल्स नावाने होतात. पॅरिस 2024 मध्ये 16 मुले व 16 मुली अशा 32 जणांच्या स्पर्धा होतील असा अंदाज आहे. त्यांच्यात हीप हाॕप फ्रीस्टाईल पध्दतीने एकास एक द्वंद होईल. पहिल्या दिवशी प्राथमिक फेरी आणि दुसऱ्या दिवशी अंतिम फेरी होतील. यात तंत्र, वैविध्य, सादरीकरण, संगीत, नाविन्य आणि व्यक्तिमत्व या सहा निकषांवर मूल्यमापन होईल. दोन्ही ब्रेकर्सचा आमनासामना होईल आणि त्यांच्यात जो सरस ठरेल तो पुढे जाईल. एकाचप्रकारच्या संगीतावर तीन स्पर्धा होतील. डीजे, पंच आणि स्थानिक डान्सर त्यांची कामगिरी बघत राहतील.

ब्रेकिंग हा क्रीडा प्रकार कसा होवू शकतो असे विचारणारांना वर्ल्ड डान्स स्पोर्ट फेडरेशनचे ज्येष्ठ सल्लागार जीन लोरेंट बुरकीन म्हणतात की, ब्रेकिंगच्या कोणत्याही सादरीकरणात खेळाचा अंश असतोच. त्यात पदलालित्य असते, हात आणि पायाचा कौशल्यपूर्ण वापर करुन सादरीकरण असते, लवचिकता व चापल्य असते आणि याला उत्तम समन्वय, ताकद आणि दमखम लागतो.त्यामुळे ब्रेकडान्सिंग हा कला व क्रीडा असा संगम असतो.

इतर खेळाडूंप्रमाणेच बी डान्सर्सना निरोगी जीवनशैली, योग्य आहार, व्यायाम आणि तासानतास सराव करावा लागतो.

ब्रेकिंगं हे जिम्नॅस्टिक्स व फिगर स्केटिंगपेक्षा वेगळे असते. यात विशिष्ट मुव्हमेंटसाठी ठराविक गूण नसतात तर दौन स्पर्धकांदरम्यान तुलना केली जाते. त्यात तंत्र, सादरीकरण आणि शारीरिक मनमोकळे सादरीकरण याच्याआधारे निर्णय होतो, त्यात शरीर, मन आणि विचारांचे संतुलन बघितले जाते आणि त्याआधारे विजेता ठरतो असे बोरकीन सांगतात.

1970 मध्ये ब्राँक्स शहरात सुरु झालेला हा नृत्यप्रकार दक्षिण कोरिया, रशिया, फ्रान्स व जपानमध्ये खूप लोकप्रिय आहे. गेल्या वर्षी वर्ल्ड अर्बन गेम्समध्ये जे 32 स्पर्धक होते ते 21 वेगवेगळ्या देशांचे होते.युवा ऑलिम्पिकमधील 24 स्पर्धक 18 देशांचे होते त्यापैकी नऊ देशांनी पदके जिंकली होती. नानजिंग येथे पार पडलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये 66 देश सहभागी होते. त्यात भूतान, कॅमेरून, एल साल्वादोर आणि आपल्या भारताचेही स्पर्धक होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER