” कशी या त्यजू पदाला ?”

How about this post

हाय फ्रेंड्स ! पूर्वीपासूनचा एक खेळ तुम्हाला माहिती आहे का ? विशेषतः स्त्रिया मंगळागौरी किंवा हरतालिका यावेळी किंवा कृष्णाष्टमीला पण हा खेळ खेळला जायचा .गोफ विणणे हा तो खेळ! त्यासाठी एका खांबाला रंगीत धागे किंवा लांब रंगीबेरंगी कापड लावली जायची, आणि चार जण आतल्या आणि चार जण बाहेरच्या वर्तुळात ते धागे धरून उभे असायचे . मग विशिष्ट पद्धतीने, गाणी म्हणत, हा गोफ विणला जायचा, आणि परत त्याच पद्धतीने तो उकलत न्यावा लागत असे. असा तो खेळ! त्यात भरपूर कौशल्य असायचं.

असाच हा गोफ ,प्रत्येक ‘कपल ‘दोघांपैकी एक जण, आतल्या सर्कलमध्ये आणि त्याचा जोडीदार बाहेरच्या सर्कलमध्ये राहून गुंफत असतो ना ? त्यांच्यात परस्परात एक नियोजन ,को-ऑर्डिनेशन लागत असतं .

आयुष्याच्या दुसऱ्या इनिंगमध्ये आपणच विणत आणलेला गोफ अलगत सोडवत न्यावा लागतो. ही सगळीच कामे कौशल्याची आणि नाजूक असतात .आणि मागे एका लेखात आपण उल्लेख केला होता ,त्याप्रमाणे आयुष्यातील नव्या इनिंगची ही इंटरंशिप पार पाडावी लागत असते. हे सगळे अनुभव परत नवीनच असतात.

मुले वाढवताना एक कसरत असते असे म्हटले जाते. पण कुणालाही तुम्ही विचारा ,”मुले मोठी झाली आता काय प्रॉब्लेम तुम्हाला मस्त मजा करा!”यावर उत्तर हेच येईल,”अहो कसलं काय ,मुले मोठी झाली की उलट प्रश्न वाढतातच. फक्त त्याचं स्वरूप वेगळं असतो एवढंच!”

याला काही अपवाद असतीलही, पण खरं उत्तर हेच मिळेल. आता फक्त भूमिका बदलतात . केवळ आई आणि बाबा ,ही भूमिका न राहता आता सासू – सासरे ,आजी – आजोबा या ही भूमिका नवीन चिकटतात, हा नवीन पदभार स्वीकारावा लागतो. सुना, जावई व नातवंडे यांची आपल्या परिघामध्ये भर पडते. हे नवे बंध जोडताना जुने बंध अजूनच जीर्ण व किचकट होत गेलेले असतात, ते म्हणजे घरातले ज्येष्ठ ! स्वतःचे आई-वडील किंवा सासू सासरे! आणि या पुढच्या पिढ्या आणि मागची पिढी यांच्यातील दुवा बनून, त्या दोघांना” गोफ सोडवणे “आणखीनच कठीण होऊन जाते. आता धागे उलगडताना विशेष काळजी घ्यावी लागते, कुठलाही धागा ओढल्या जाऊ द्यायचा नसतो किंवा त्याचा गुंताही होऊ द्यायचा नसतो.

यातील दोघांमधला एक जण म्हणजे ” तो “तरी कदाचित बाहेरच्या वर्तुळात असल्याने ,मोकळा असतो. स्वतःला जास्त गुंतवून घेत नाही. (अर्थात “त्याचाही भूमिकेतून “एखादा लेख असावा लागणारच आहे). खरी कसरत असते ” ति “ची! एकीकडे सुना, -मुले ,जावई,नातवंडे तर दुसरीकडे तिचे स्वतःचे सासू-सासरे किंवा कधीकधी आई-वडीलही! मग तिचा दुसरा हि खेळ सुरु होतो.”नाच ग घुमा , कशी मी नाचू ?”

तिच्या एक ,एक मैत्रिणी आता साधारण याच अनुभवातून जात असतात ,थोड्या पुढे किंवा मागे. जुनी मैत्री परत उचंबळून येते .परत एकमेकीशी आपले ,आपले अनुभव शेअर व्हायला लागतात. आणि त्यातून “कशी मी नाचू ?” या प्रश्नांना पर्याय मिळायला लागतात!

दोन दिवसांपूर्वी एका मैत्रिणीचा मिस कॉल दिसला .कॉल बघायला खूप उशीर झाला म्हणून मी तिला परत कॉल करायचे टाळले . नुकतीच तिच्या मुलीची डिलिव्हरी होऊन नातू झाल्याचा तिने ग्रुपवर टाकलं होतं .घरात लहान बाळ असल्याने ,त्याच्या वेळा वगैरे मध्ये नको डिस्टर्ब करायला.म्हणून! परत दुसऱ्या दिवशी तिचा फोन आला तेव्हा मी फोन उचलला आणि मग काय गप्पांचा धबधबा सुरू झाला. आवाज थोडा दम लागल्या सारखा येत होता. म्हणून विचारलं तर म्हणाली ,”अग मी संध्याकाळी खाली राऊंड मारायला आले होते ,तेवढाच मुलगी व जावई यांना बोलायला, बसायला वेळ मिळतो! ”
आणि मग कसला राउंड अन कसलं काय !आमचं नेहमी असंच होतं, फिरण्याच्या निमित्त्याने मैत्रिणी आणि बहिणीचे गप्पांचे गुऱ्हाळ चालतात. ती सांगू लागली, “मी सध्या मुलीकडेच आहे ,पण तसं करावं लागतं ग बरंच अडजस्ट! लॉक डाऊन ,बायका कामावर नाही. त्यामुळे बाळाला आम्ही आंघोळ घालतो, तेल लावतो .बाळाचे कपडे धुवायचे ! इतर कामांना मिळाली आहे बाई! पण तरी पण भरपूर काम पुरतात.”

सुरुवातीला तर मला, या “मैत्रीण आजीबाईचं” हसूच आलं .”काय जमतयका पण? आंघोळ वगैरे घालायला बाळाला ?”मी विचारलं. “हो !आम्ही “अमेझॉन” वरून एक खुर्ची मागवली आहे. अंघोळ घालायला! “अरे वा नवीनच इन्फॉर्मेशन! मी लगेच त्या खुर्ची रुपी बाथटबचा फोटो बघायला मागितला .पुढे मागे येईलच कामाला! सुनेने काही गोड बातमी आणली तर असो माहिती! ( कदाचित सूनेला तोपर्यंत आणखीन १० गोष्टी माहिती असतील,पण माझा नसता उपद्व्याप)

“मुलीच्या सासूबाई पण होत्या दोन महिने!”

“हो! पण मग त्यांच्याबरोबर राहण्याचा, तोही अनुभव नवीनच , म्हणजे त्यांच्या पद्धती ,त्याच्याशी ॲडजस्टमेंट!” ही प्रॉपर किल्ली वापरलेली ,आणि मग सगळ्याच अनुभवांचा वृत्तान्त मला कळला ,आणि माझा सेकंड इनिग इंटरंशिपचा एक “प्रोजेक्ट रिपोर्ट “पूर्ण झाला.

मृणाल सांगत होती ,”अग ह्या मुली जास्त कामही नाही करू शकत, झटपट आटपतपण नाहीत. मग गडबड व्हायला लागली की परत आपणच पदर खोचून तयार राहावं लागतं. आपण कसं आपल्या बाळाचे कपडे ,औषध सगळं आपले अापण आटपायचो. ह्या तशा नाहीत ,त्यामुळे आपल्यालाच थकेपर्यंत काम करावच लागत. सांगणार कुणाला “आपलेच दात आणि आपलेच ओठ!”

आज-काल नवीन मुलींसुना या त्यांच्या नवऱ्याबरोबर कामे करतात स्वयंपाक घरात! त्यामुळे मदतीला आलेल्या आया – सासवांची पंचाइत होते. पूर्वी अनुभव गाठीशी असल्याने अायांच्या सल्ल्याने सगळे सोपस्कार व्हायचे, कमीत कमी वेळ निभावून नेइपर्यंत तरी, न आवडलेल्या गोष्टी पण एक्सेप्ट केल्या जायच्या. पण आज बाळाला वाढवण्याच्या, त्याच्या खाण्यापिण्याच विषयीच्या, स्वच्छते विषयी च्या ,स्वतः बाळंतिणीने काय खावे ,काय करावे ,करू नये या विषयाच्या संकल्पना खूप बदलल्या आहेत. त्यातून गुगल ने दिलेले ज्ञान डोईजड होते आहे. शास्त्रीय कारणांसाठी या मुली गुगल सर्च करतात. आणि करण्यासाठी येणाऱ्या आई किंवा सासूला परत एकदा सुन वा मुलीच्या ट्रेनिंग खाली काम करावे लागते.

माझ्या मैत्रिणीने मृणालने समदुःखी अशा आमच्या एका मैत्रिणीला माधुरीला (नुकत्याच आजी झालेल्या) कन्सल्ट केलेले होते, तुझी मुलगी नोकरीवर गेल्यावर तू बाळाला तिच्या सांभाळणार आहेस का? त्यावर माधुरीने तिला सांगितले ,”नाही ग बाई ,मी मुलीला सांगून टाकले आहे मी आता राहिल मी पण नंतर तुमची मुलं तुम्ही मॅनेज करा. तु राहते कोथरूडला, मी राहते बाणेर ला. तू केव्हा माझ्याकडे सोडणार त्याला आणि केव्हा घेऊन जाणार!” मृणालनी लगेच तिच्या सल्ल्याची अंमलबजावणी केलेली दिसली. तीनेही मुलीला सांगून ठेवले,

“हे बघ मी सांभाळीन. पण मला पण कुठे गावाला जावं लागेल. किंवा मैत्रिणींबरोबर ट्रीपला जावंसं वाटेल .तर तशी मला मोकळी पाहिजे ,मला माझा व्यायाम असतो .माझे छंद असतात!” खूप वेळ झाला म्हणून मृणालने आणि मी फोनवर बोलणे थांबवले. पण मनात विचार आला ,हो हे पण मात्र जरा जास्तच वाटते ना ?माझ्या भीशीतल्या नुकत्याच सुन अालेल्या मैत्रिणीचा अलार्म लगेच माझ्या डोक्यात वाजला,ती म्हणाली होती,”जावे बाई मदतीला हीच तर वेळ असते ग मदतीची .तुम्ही जीव नाही लावला तर त्या मुली तरी आपल्याला कसा जीव लागणार?”

ती म्हणत होती त्यात खरच तथ्य होते. सभोवताली बघताना असे दोन्ही बाजूनी अनुभव समोर येतात. दोन्ही बाजूंनी ताणून धरणे अयोग्यच! आयुष्याच्या पुढच्या वळणांवरची इंटरंशिप ही अशीच अनुभवांच्या भांडारातून होत असते, यातून बरंच काही शिकायला मिळतं.

या जनरेशन मधील ,आयांनी” सासू “हे पुढचे पद जवळ जवळ पुसून टाकले आहे. आपले पद ,”सासू किंवा आजी “हे विसरून ,कोणी मागितल्याशिवाय सल्ले न देणे किंवा नवीन पद्धती शिकत जाणे हे करत असताना, कधीतरी नकळत बंडखोर मन “कशी या त्यजू पदाला” म्हणत राहत. तिथे आजच्या तरुण पिढीने हात पुढे करू “तेवढा अडथळा” पार करून द्यावा अशी अपेक्षा असते. आणि तेवढं करायला काहीच हरकत नाही. हो ना ?

(आपण “ती” ची भूमिका बघितली.पण “त्याच्या” या बदललेल्या भूमिकेच काय ?आपल्या अनुभवांचे स्वागत आहे.)

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER