ठाणे शहरातील दिव्यांगांना मिळणार हक्काचे घर

Municipal Commissioner Sanjeev Jaiswal
  • १० सप्टेंबरपर्यंत पहिल्या टप्प्यातील घरांचे वितरण
  • महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांचा निर्णय

ठाणे : दिव्यांग व्यक्तींना उदरनिर्वाहाकरीता स्टॉल उपलब्ध करून देण्याच्या महत्वाच्या निर्णयानंतर त्यांना हक्काच्या निवा-याची सोय महापालिकेडून करण्यात येणार असून बीएसयूपी अंतर्गत पहिल्या टप्प्यात देण्यात येणाऱ्या घरांचा ताबा १० सप्टेंबर २०१९ पर्यंत देण्याचा महत्वाचा निर्णय महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला. त्याचबरोबर अतिरिक्त १०० नवीन घरे देण्याचा निर्णयही जयस्वाल यांनी घेतला. दरम्यान ८० टक्के अपंग असणाऱ्या दिव्यांगांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार असून ४० टक्के अपंग असणाऱ्या दिव्यांगांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे.

प्रहार अपंग क्रांती संघटनेच्यावतीने विविध मागण्याचे निवेदन महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना देण्यात आले होते. या सर्व मागण्यांबाबत अपंग संघटनेच्या शिष्ट मंडळासोबत बैठक घेऊन महापालिका आयुक्त श्री.जयस्वाल यांनी त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत.

यावेळी अतिरिक्त आयुक्त(1) राजेंद्र अहिवर, अतिरिक्त आयुक्त(2) समीर उन्हाळे, उप आयुक्त ओमप्रकाश दिवटे, अशोक बुरपल्ले, मनीष जोशी, वर्षा दीक्षित, नगर अभियंता रवींद्र खडताळे, माहिती व जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर, शहर विकास व नियोजन अधिकारी प्रमोद निंबाळकर, सहाय्यक आयुक्त महेश आहेर, समाज विकास अधिकारी श्री.वाघमारे, प्रहार अपंग क्रांती संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बापूराव काणे, सचिव रामदास खोत, ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद बनकर, कोकण विभाग उपाध्यक्ष अजित गुंजाळ, सचिव राजेश सोनी, ठाणे शहर अध्यक्ष मुकेश घोरपडे, विलास सोनावणे, संजय कामटकर तसेच शहरातील अपंग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ठाणे महानगरपालिका दिव्यांग व्यक्तीच्या कल्याणासाठी सदैव तत्पर असून महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिव्यांगांच्या हक्काच्या घरासाठी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल प्रहार अपंग क्रांती संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बापूराव काणे यांनी आयुक्तांचे विशेष आभार मानले.

दिव्यांगांना उदरनिर्वाहाबरोबर त्यांच्या निवा-याची सोय व्हावी यासाठी ठाणे महानगरपालिका हद्दितील दिव्यांगांकरिता बीएसयूपी अंतर्गत घरे उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. यामध्ये पहिल्या टप्यातील घरे १० सप्टेंबर पर्यत देण्यात येणार आहे. एकूण १९० घरांसोबत अतिरिक्त १०० घरे देण्याच्या निर्णय महापालिका आयुक्त श्री.जयस्वाल यांनी घेतला आहे. यामध्ये भारतात कोठेही घर नसल्याची अट रद्द करून ठाणे जिल्हा, मुंबई व नवी मुंबई येथे घर नसलेल्या आणि दिव्यांग कुटुंबातील एकाच व्यक्तीला सदरचे घर देण्यात येणार आहे.

ठाणे महानगरपालिका हद्दितील दिव्यांगांचे जीवनमान उंचावण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्यावतीने विविध योजना राबविण्यांत येत आहेत. दिव्यांग व्यक्तींच्या उदरनिर्वाहासाठी महापालिकेने स्टॉल उपलब्ध करून दिले असून दिव्यांगांना त्यांच्या प्रभागांनुसार स्टॉल बदलून देण्यासोबतच उर्वरित नवीन स्टॉल प्रभागसमितीनुसार वितरण करण्यात येणार आहे. तसेच नवीन स्टॉलसाठी अर्जाचे वितरण करण्यात येणार असून अर्ज करण्यासाठी 15 सप्टेंबर 2019 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

ठाणे महापालिकेच्या समाज विकास विभागाच्यावतीने पालिका क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तीच्या कल्याणासाठी, त्यांना सामाजिकदृष्ट्या सामावून घेण्यासाठी व त्यांची भावनिक उन्नत्ती होण्यासाठी विविध योजना राबवल्या जात असून काशिश पार्क येथे दिव्यांग व्यक्तींसाठी कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येणार आहे. तसेच कॉल सेंटरमध्ये अपंगांना प्राधान्य देण्यासाठी ठाण्यातील कॉल सेंटरशी चर्चा करण्यात येणार आहे.