एका लग्नाची हाउसफुल्ल गोष्ट

एका लग्नाची हाउसफुल गोष्ट

कोणत्याही नाटकासाठी, नाटकातील कलाकारांसाठी कुठली गोष्ट महत्त्वाची असते  तर ती म्हणजे रसिकांची दाद. कलाकार रंगभूमीवर येतात आणि पडदा उघडला जातो तेव्हा समोर बसलेले रसिक, त्यांच्याकडून येणाऱ्या टाळ्यांचा गजर, एखाद्या
संवादाला मिळणारी दाद आणि थिएटरबाहेर लागणारा हाउसफुल्लचा बोर्ड हे सगळं एखाद्या रंगकर्मीसाठी टॉनिक असतं. मात्र हेच टॉनिक गेल्या सात-आठ महिन्यांपासून अर्थातच कोरोनामुळे (Corona) बंद होते. पण आता सरकारने नाट्यगृह सुरू करायला हिरवा कंदील दिल्यानंतर नाट्य प्रयोगाचे बोर्ड नाट्यगृहाबाहेर लागले होते. लॉकडाऊननंतर ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाचा पहिला प्रयोग सादर होणार आहे.

या प्रयोगासाठी हाउसफुल्लचा बोर्ड लागला आहे. या नाटकातील प्रमुख व्यक्तिरेखा साकारणारे अभिनेते प्रशांत दामले आणि अभिनेत्री कविता लाड यांनी त्यांच्या सोशल मीडिया पेजवर हा क्षण शेअर केला आहे. सिनेमांमध्ये अनेक जोड्या गाजतात. मालिकांच्या जोड्या लोकप्रिय होतात. तसेच रंगभूमीवर एखादे नाटक करण्यासाठी जोडी एकत्र येते आणि प्रेक्षकांचा या जोडीला भरभरून प्रतिसाद मिळतो. अशा जोड्यादेखील रंगभूमीवर गाजलेल्या आहेत. आणि यातील एक जोडी म्हणजे अभिनेते प्रशांत दामले आणि कविता कविता लाड मेढेकर. यांची जोडी जवळपास पंचवीस वर्षांपूर्वी, ‘एका लग्नाची गोष्ट’ या नाटकाच्या निमित्ताने ही जोडी रंगभूमीवर एकत्र आली. या नाटकाने तुफान लोकप्रियता मिळवली. हजारो प्रयोग या नाटकाचे झाले. वैवाहिक जीवनातील अनेक वाटा-वळण, चढ-उतार यांच्यावर बेतलेलं हे नाटक प्रेक्षकांना भलतंच आवडलं. त्यानंतर प्रशांत आणि कविता आपापल्या सिनेमा, मालिका किंवा अन्य काही नाटकं यांच्या व्यापात गुंतले आणि त्यांचा वेगळा प्रवास सुरू झाला. मात्र ‘एका लग्नाची गोष्ट’ नाटक म्हटलं की, कविता आणि प्रशांत यांचं नाव रसिकांना हमखास लक्षात येते.

एका लग्नाची पुढची गोष्ट यानिमित्ताने हीच जोडी पुन्हा रंगभूमीवर तितकीच रंगतदार गोष्ट घेऊन आली आहे. लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी या नाटकाचे प्रयोग सुरू होते; मात्र गेल्या आठ महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी सिनेमा थिएटर तसेच नाट्यगृह बंद ठेवण्यात आले होते. परिणामी या नाटकाचे प्रयोग थांबले होते. आता १२ आणि १३ डिसेंबरला ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ नाटकातून सांगण्यासाठी प्रशांत दामले आणि कविता लाड दोघेही रंगभूमीवर येत आहेत. त्यासाठी गेल्या महिनाभरापासून या नाटकाच्या टीमची जोरात तयारी सुरू होती. खरे तर नाटकाला जरी परवानगी मिळाली असली किंवा नाट्यगृह सुरू करण्यासाठी जरी हिरवा कंदील दिला असला तरी एकूणच नाट्य निर्मात्यासमोर हा प्रश्न होता की, प्रयोग लावला तरी प्रेक्षक येतील का? अजूनही कोरोनाची धास्ती कमी झालेली नाही. अजूनही संसर्गाचा धोका आहे. त्यामुळे नाटकांना प्रेक्षक येतील की नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न होता आणि यामुळे जरी नव्याने डाव मांडला असला तरी तो प्रेक्षकांच्या सहकार्याशिवाय पूर्ण होण्यासारखा नव्हता.

त्यामुळे या नाटकातील कलाकार असतील, पडद्यामागचे तंत्रज्ञ असतील किंवा निर्माते या सगळ्यांची काळजी होती की, प्रेक्षागृहात किती प्रेक्षक असू शकतील. मात्र नाटकाचा प्रयोग जाहीर होताच या प्रयोगाला मिळालेली दाद, नाट्यगृहाबाहेर लागलेल्या ‘हाउसफुल्ल’ या बोर्डने दाखवून दिली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांना सर्व प्रकारच्या नियमावलीचे पालन करून या नाटकाला येण्याचे आवाहन दस्तुरखुद्द प्रशांत दामले आणि कविता लाड यांनी तिकीटगृहाच्या बाहेर उभे राहून केलं होतं. त्यालादेखील प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला आहे.

एक नाटक हे जवळपास पन्नास ते साठ जणांचे युनिट आणि त्यांचे कुटुंब चालवत असते. त्यामुळे का असेना मनोरंजन क्षेत्रातील पडद्यामागे काम करणाऱ्या लोकांची आर्थिक घडी पुन्हा रुळावर आणायची असेल तर रसिक प्रेक्षकांनी विश्वासाने एक पाऊल पुढे टाकले पाहिजे, असं प्रशांत दामले यांनी यानिमित्ताने सांगितले आहे. आता तर ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकासाठी थिएटरबाहेर लागलेला आहे अशाच पद्धतीचे अनेक हाउसफुल्लचे बोर्ड पुढच्याही प्रयोगांना लागावेत, अशी आशा कविता लाड यांनी व्यक्त केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER