उद्यापासून अर्थचक्र फिरणार : हॉटेल, बार उघडणार; पण पाळावे लागणार हे नियम

hotels and resorts in areas other than containment zones

कोरोनाच्या (Corona) लॉकडाऊन काळात लाखो ग्राहक ज्या गोष्टीची वाट बघत होते ती आता उघडणार आहे आणि ते म्हणजे हॉटेल्स आणि रेस्टॉरन्टस.  सहा महिन्यांपासून बंद असलेले हॉटेल उद्योगाचे विश्व आता खुले होणार असून चमचमीत पदार्थांची मेजवानी खवय्यांना मिळणार आहे, तसेच हॉटेलच्या खाण्यावर अवलंबून असलेल्यांचीही सोय होणार आहे.

मुंबईत सोमवारपासून (दि. ५)  रेस्टॉरंट, बार सुरू होणार असल्याने गेल्या सहा  महिन्यांपासून बंद असलेल्या हॉटेल उद्योगाचे ‘अर्थचक्र’ फिरू लागणार आहे. मुंबईत ३३ टक्के तर राज्यात ५० टक्के क्षमतेने बार, रेस्टॉरंट सुरू होणार आहेत. मुंबईत मार्चमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर जाहीर करण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे गेल्या सहा  महिन्यांपासून बार-रेस्टॉरंट बंद आहेत. कोरोना रोखण्यासाठी बार-रेस्टॉरंट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी या उद्योगावर अवलंबून असणारे लाखो कामगार बेरोजगार आहेत.

यामुळे राज्य सरकारच्या ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत आवश्यक खबरदारी घेऊन रेस्टॉरंट, बार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज्य सरकार आणि हॉटेल, बार, रेस्टॉरंट संघटना यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर  हे व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरात हॉटेल, रेस्टॉरंट मालक-चालकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या सहा महिन्यांनंतर व्यवसाय सुरू होणार असल्याने जागेची स्वच्छता, निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.

‘ऑनलाईन’ बुकिंगला प्राधान्य

कोरोना नियंत्रणात आला असला तरी संकट टळलेले नाही. तरीही हॉटेल व बार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन, गर्दी टाळण्यासाठी शक्यतो आॅनलाईन बुकिंगवर भर द्यावा. जेणेकरून नियमांचे पालनही होईल आणि जेवणाचा आस्वाद घेता येईल, असे आवाहन पालिकेने केले आहे.

मुंबईत रेस्टॉरंट, बार ३३ टक्के क्षमतेवर सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांमध्ये सोशल डिस्टन्स पाळणे, तीन फुटांचे अंतर ठेवणे, वेळोवेळी जागेचे निर्जंतुकीकरण करणे, स्क्रिनिंग करणे अशा व्यवस्था ठेवणे बंधनकारक राहणार आहे. हे नियम मोडल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांचा परवाना रद्द करणे, दंड वसूल करणे अशी कारवाई केली जाणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. बार, रेस्टॉरंट चालकांकडून नियमांचे पालन होते की नाही यावर नजर ठेवण्यासाठी विभागवार पालिकेची पथके  नजर ठेवणार आहेत. ही पथके कोणत्याही वेळी व्हिजिट करणार असून नियम मोडल्याचे निदर्शनास आल्यास कठोर कारवाई केली जाणार असल्याचेही काकाणी म्हणाले.

सोमवारपासून हे सुरू होणार

राज्यात ५ ऑक्टोबरपासून हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार, फूडकोर्ट ५० टक्के ग्राहक क्षमतेने सुरू होतील. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ३३ टक्के उपस्थितीत या सेवा देता येतील. मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व इंडस्ट्रीअल आणि मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू होणार. हे मात्र बंदच राहणार कोरोनाच्या प्रभावामुळे राज्यातील शाळा, कॉलेज, सिनेमागृह, स्वीमिंग पूल,  थिएटर, मेट्रो सेवा मात्र तूर्तास बंदच राहणार आहे.

ही बातमी पण वाचा : राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, बारसाठी नियमावली जाहीर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER