घोड्यासाठी नाल अन् नालीसाठी घोडा

घोड्यासाठी नाल अन् नालीसाठी घोडा

दोन-तीन दिवसांपूर्वी मी बँकेत एक काम होते म्हणून बाहेर पडले. जाताना आजूबाजूची दुकानं बघत जात होते. तेवढ्यात मला’ ते ‘दुकान दिसले. ज्यातून मी दोन वर्षांपूर्वी बरेच ड्रेसेस घेतले होते. त्यानंतर प्रत्येक वाढदिवसाला, एनिवर्सरीला, एवढेच काय प्रत्येक सणाला किंवा सिझन बदलाला मेसेजेस यायचे की तुमचे इतके पॉईंट जमा झाले आहेत आणि ते या तारखेपर्यंत आहेत. खरं तर अशा गोष्टींना न भूलणारी म्हणून माझ्या परिवारात माझा नावलौकिक आहे. पण तीन दिवसापूर्वी मात्र एनिवर्सरीबद्दल मेसेज आलेला होता आणि तो फक्त आजच्या दिवसापर्यंत व्हॅलिड आहे असं मला लक्षात आलं. म्हटलं चला, आलोच आहे इकडे तर जाऊया ! आणि काय म्हणता चारशे रुपयांच्या पॉइंट्स साठी मी २३०० रू. ची खरेदी केली. परत परत मनाला बजावत होते, फक्त चारशे रुपये कमी होणार आहेत. बघ ! एकदा त्यांना साधारण माझा चॉईस कळल्यानंतर त्यांनी फारच सुरेख आवडतील असे ड्रेस मटेरियल समोर टाकायला सुरुवात केली. बस! पुरे आता म्हटल्यावरही बघा तर खर मॅडम. बघायला काय लागतं ! असं म्हणत म्हणत मग मी एका ऐवजी दोन ड्रेस उचललेच. त्याचबरोबर दुकानात आणखीन काय काय आहे? स्टिचिंगही आम्ही करतो. एखादा शिवून बघा. अशी लालूच दाखवणे सुरू होतं. पण मी फार निश्चयपूर्वक काऊंटरकडे गेले आणि बिल pay करणार तेवढ्यात….. तेवढ्यात मला खणाच्या धारवाडी कॉटन, चंदेरी विविध प्रकारच्या एकदम रिच, ग्रेस फुल साड्या दिसल्या आणि माझा निश्चय पार ढासळायला लागला. प्लेन साड्यांवर प्रिंटेड ब्लाऊजची आजकाल फार चलती आहे. आणि त्या दिसतातही मस्त ! उभी असलेली मी खुर्ची ओढून खुर्चीवर बसले. माझा रागरंग बघून तेथील मुलाने लगेच पाणी आणलं समोर. मॅडम कॉफी? (पाणी, कॉफी पिणे होईपर्यंत अजून चार दोन साड्या,”तुम्हाला कोणताही रंग छान दिसतो मॅडम गोऱ्या आहात”असं म्हणत माथी मारायच्या प्रयत्नात असताना मात्र)मी तो बेत मात्र हाणून पाडत फक्त (?) एक साडी घेऊन बाहेर पडले. चारशे पॉइंट साठी ३६८० रुपयाचे बिल करून ! त्यासाठी किती निग्रह करावा लागला. आणि पुन्हा काही डिस्काउंट द्या वगैरे म्हटल्यावर, आमच्याकडे पॉइंट्स हीच पद्धत आहे. डिस्काउंट नाही. असं सांगितलं. मी कौतुकाने मान हलवली कारण परत पॉईंट्स चे मेसेजेस माझ्याकडे सुरू होणार होते.

फ्रेंड्स ! तुम्ही म्हणाल, तुम्ही हे सगळे आम्हाला का सांगत आहे ? पण हा असा प्रकार कमी अधिक फरकाने प्रत्येक सामान्य माणसासोबत घडत असतो. याला मानसशास्त्रात म्हणतात, “डेनिस डीड रोट इफेक्ट !” त्याबद्दलची घटना अशी की फ्रेंच फिलोसोफर, डेनिस डीडरोट नावाचा एक अभ्यासू वाचक होता. इसवीसन 1765 मध्ये त्याचे वय जवळपास 52 वर्षे होते. त्याने खूप ग्रंथ वाचले होते. त्याचे स्वतःचे मोठे ग्रंथालय होते. म्हणजे त्याचे संपूर्ण आयुष्य वाचनात पण गरिबीत गेले. मुलीच्या लग्नासाठी सुद्धा त्याच्याकडे पैसे नव्हते. इतका तो गरीब होता. त्यावेळी तेथील राज्याची राणी कॅथरीनला, डेनिसच्या गरिबी बद्दल कळले तिने रोटला त्याच्याकडील लायब्ररी विकत घेण्यासाठी 1000 GBP, म्हणजेच पन्नास हजार डॉलर्स आजचे साडेतीन कोटीच्या आसपास रुपये देऊ केले. त्याने ते मान्य केले आणि त्याने आपले ग्रंथालय विकून टाकले.

डेनिस एका दिवसात खूप श्रीमंत झाला. त्याने त्या पैशातून लगेच” स्कार्लेट रॉब” म्हणजे एक उच्च प्रतीचा व महाग असा पोशाख खरेदी केला .हा सदरा वापरत असताना त्याने म्हटले की आपण उच्च प्रतीचा पोशाख घालतोय ,पण आपल्या घरात मात्र तशा उच्च प्रतीच्या वस्तू नाहीत .मग त्याने हळू घरातल्या वस्तू बदलल्या. किचन रूम मधल्या वस्तू बदलल्या . फर्निचर बदलले. सगळं काही नवं नवं .आता त्याचे संपूर्ण घर आणि पोशाख दोन्ही शोभून दिसत होते. परंतु हे सगळं केल्याने तर पुन्हा कंगाल झाला आणि कर्ज वाढत गेलं. मोठ्या दुःखाने डेनिसने हे सहन केलं आणि मग त्याने हे सगळे अनुभव आपल्या एका निबंधात लिहून ठेवले .यालाच मानसशास्त्रातील डीडरोटइफेक्ट(Diderot Effect) म्हणतात. या संकल्पनेचा शोध सर्वप्रथम डेनिस ने लावला. परंतु 1988 मध्ये Grant McCracken या मानववंशशास्त्रज्ञाने याचे नामकरण केले.

सगळेच मोठे उद्योजक, व्यापारी, ट्रेडर्स ,डेव्हलपर्स या इफेक्टचा नकळत उपयोग करत असतात. वर म्हटल्याप्रमाणे आपल्यालाही हे अनुभव वारंवार येत असतात. बरेचदा आपण मोठं नवीन काहीतरी फर्निचर एखादं घेतलं की त्याच्या आजूबाजूच्या वस्तू या आपोआपच जुन्या वाटायला लागतात. मग आपोआपच त्याला शोभतील अशा आजूबाजूच्या वस्तू आपण घेतो .थोडक्यात सांगायचं तर एक नवीन वस्तू विकत घेतली की तिच्यामुळे दुसऱ्या वस्तूंचा दर्जा आपोआपच कमी होतो आणि तो वाढविण्‍यासाठी आपण आणखीन जास्त खर्च करत जातो दुसर्‍या वस्तू अजुन घेतो, गरज नसली तरी .अशा पद्धतीने आपण एकेक वस्तू घेऊन अनेक अनावश्यक किंवा फारशा महत्त्वाच्या नसणाऱ्या वस्तू घेत असतो आणि ते आपल्याला कळत सुद्धा नाही यालाच”spiraling consumption”म्हणतात. म्हणजेच एका वस्तूंमुळे दुसऱ्या वस्तूची गरज वाटणे आणि ती विकत घेणे आणि हाच तो डीडरोट इफेक्ट ! ही मानवाची फार नैसर्गिक टेंडन्सी आहे.

अशावेळी खर्च करताना तर काही वाटत नाही पण नंतर जेव्हा हिशोब लावतो ,त्यावेळेला त्याचा फार त्रास होतो. नुकताच घराला रंग देताना सुद्धा मला हाच अनुभव प्रकर्षाने आला. घराला बांधून अठरा एकोणवीस वर्षे झाली .एव्हढ्यावर्षात दोनतीन वेळा रंग कामही झाले. परंतु यावेळी बरीच कामे यासाठी होती. वॉटरप्रूफिंग, इतर काही छोट्या-मोठ्या दुरुस्त्या, एकेक म्हणता म्हणता प्लंबर ,कारपेंटर, वॉटरप्रूफिंग वाले अशी बरीच कामं निघत गेली. मग रंग दिल्यानंतर घर खूप छान दिसायला लागलं. आणि मग ते बघितल्यावर घराच्या दारे खिडक्या यांना पॉलिश ची गरज जाणवली. तेही झालं. त्यानंतर रंगाचं कॉन्ट्रॅक्ट ज्यांच्याकडे होतं ते म्हणाले,की आता दाराची हँडल्स खूप जुनी दिसतात,तसेच टाइल्स ,बेसिन हेही त्या पुढे जुने वाटायला लागले. किचन मधले फर्निचर थोडेसे बदलले, त्यामुळे आता त्यामधली क्रोकरी नवीन आणावीशी वाटू लागली. आणि तशी खरेदी होऊ लागली. आमच्या अंगण झाडंणारी मावशी म्हणाली ,बाहेरच्या फरशीला पॉलिश करून टाका ना मॅडम! म्हणजे सगळ्च छान दिसेल. तेव्हढ कशाला सोडता ! म्हणजे काय बघा ना ! घोड्यासाठी नाल आणि नालीसाठी घोडा ! म्हणजेच आपला “डीड रोट इफेक्ट !”

या प्रवृत्तीचे परिणाम भयानक होत असतात. पण ते डोळे उघडे असले तरी आपल्याला दिसत नाहीत. आपण नकळतपणे अनावश्यक खर्च करत राहतो. काहींच्या तर ते कधीच लक्षात येतं नाही.

फ्रेंड्स ! म्हणूनच कोणतीही वस्तू खरेदी करताना या वस्तूची मला कितपत गरज आहे ? असा स्वतःचा स्वतःला प्रश्न विचारावा. आणि विचार केल्यानंतर जर उत्तर हो आलं तरच ही वस्तू खरेदी करण्याचा निर्णय घ्यावा .पुन्हा त्या वस्तूचा दर्जा आणि किंमत वाजवी आहे की नाही ? ती आपल्या बजेटमध्ये आहे की नाही ? याचाही विचार करावा. वर एका उदाहरणात सांगितल्याप्रमाणे दुकानदार एक वस्तू समोर ठेवतो, लगेच दुसरी वस्तू दाखवून संभ्रम निर्माण करतो. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की वस्तू कितीही चांगली असली तरी ती आपल्या उपयोगाची आहे का? आणि आपल्या आनंदाची निगडित आहे का? बरेचदा हा आनंदही क्षणिक असतो. कालांतराने तो संपतो आणि पैसेही वाया जातात. म्हणूनच या प्रवृत्तीला आळा घालण्याची गरज वाटते.

ही बातमी पण वाचा : पाण्यातले पहाता प्रतिबिंब हासणारे

मानसी गिरीश फडके
(समुपदेशक व सायकोथेरपिस्ट)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER