हॉर्न ओके प्लीज ? प्लीज… हॉर्न, नॉट ओके…

traffic signal

Shailendra Paranjapeपुण्यात वाहन चालवायला शिकला की माणूस चंद्रावरही गाडी चालवू शकतो, असं सांगितलं जातं. त्याचं मुख्य कारण पुण्यातल्या वाहतुकीचा अंगभूत बेशिस्तपणा. मागच्या पिढीतले म्हणजे आत्ता पन्नाशी नुकीतच पार करत असलेले सारे जण  मूळचे पुणेरी सायकलवाले होते. त्यामुळे प्रसंगी अचानक फूटपाथवर सायकल चढवून वाहतूक कोंडीच्या पुढे निसटायचे कसब त्यांच्या अंगी बालपणापासूनच आहे.

त्याशिवाय या मूळ पुणेरी सायकलवाल्यांचे रूपांतर दुचाकी चालकांमधे झाल्याने आणि त्यातल्याच काहींचे चार चाकीवाल्यांमधे रूपांतर झाल्याने रस्त्याच्या वाहतूककोंडीत अगदी डाव्या बाजूने आपली मोटार दामटणारा चार चाकीवाला पुण्यात सहज दिसू शकतो. तो तसे करताना त्याच्या डाव्या बाजूला रस्त्याच्या कडेला चेंबवला जाणारा दात ओठ खाणारा दुचाकीवालाही नजरेस पडू शकतो.

हे सारं सांगण्याचं कारण म्हणजे पुण्याच्या वाहतूक कोंडीत, कार्यालयीन वेळात रस्त्यावरच्या गर्दीत आपापल्या गाड्यांचे हॉर्न कर्कशपणे वाजवणाऱ्यांना शनिवार १२ डिसेंबरला एक विनंती केली गेलीय ती म्हणजे हॉर्न अजिबात न वाजवण्याची. पुण्यामधे १२ डिसेंबरला नो हॉर्न डे पाळला जाणार आहे. नो हॉँकिंग डे पाळला जाणार आहे.

पुणे तिथे काय उणे असं उगीच नाही म्हटलं जात. विविध सामाजिक चळवळींचं पुणं हे माहेरघर. पदपथ वाचवा, टेकड्या वाचवा, निसर्ग वाचवा इथपासून ते चिमण्या वाचवा, मार्जारप्रेमी, डावखुऱ्यांची संघटना, दर्यावर्दींची संघटना, गिर्यारोहणातले, किल्ले वाचवा एक ना दोन, पुण्यात वाटेल त्या आणि वाट्टेल त्या विषयातले प्रेमी एकत्र येऊन संस्था, संघटना स्थापन करू शकतात. अगदी मेट्रोविरोधी असो किंवा एखादा रस्ता एकेरी करावा की दुहेरी, या विषयावरचे स्वयंघोषित तज्ज्ञ किंवा खरे तज्ज्ञ, चळवळे तलवारी उपसून सरकारवर पोलिसांवर रिक्षावाल्यांवर, बँककर्माचाऱ्यांवर, सरकारी नोकरांवर, राजकारण्यांवर प्रसंगी कोणावरही टीका करायला सिद्धच असतात.

लाइफसेव्हिंग फाउंडेशन यांनी पुणे पोलिसांचा वाहतूक विभाग आणि नवचैतन्य हास्ययोग परिवार यांच्यासह शनिवारी पुण्यात एक दिवस हॉर्नला विश्रांती हा उपक्रम राबवायचं ठरवलं आहे. नो हॉर्न या संकल्पनेला प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राबवणार असल्याचं लाइफसेव्हिंग फाऊंडेशनचे देवेंद्र पाठक यांनी नमूद केलंय.

पुणे शहरामधे सर्वाधिक दुचाकी गाड्या असून ही संख्या सुमारे तीस लाखाच्या घरात आहे. रिक्षांची संख्या पन्नास हजाराच्या आसपास आहे. त्याशिवाय खासगी चार चाकी गाड्या, हॉर्न वगळता बाकी सर्व वाजणाऱ्या पीमटी अर्थात पालिकेच्या सार्वजनिक व्यवस्थेच्या बसगाड्या यांचीही भर पुण्याच्या वाहतुकीत पडत असतेच. ही सारं वाहनं चालवणारे सगळेच पंचम जॉर्जच्या थाटात रस्त्यावर वावरत असल्याने त्यांच्यासमोर कोणी आले की किंवा येऊ घातले की ते कर्कशपणे हॉर्न वाजवणारच.

पुण्यात दर दिवशी एक कोटीवेळा विविध प्रकारचे हॉर्न वाजवले जातात आणि त्यातले नव्वद टक्के वेळा ते अनाठायी वाजवले जातात. ही आकडेवारी लक्षात घेतली तर सहज आपल्या सर्वांना आठवेल की वाहतुकीचा सिग्नल लालचा हिरवा झाला की अनेकांना हॉर्न वाजवायची सवय असते. जणू काही पुढचा गाडीवाला रस्त्यात मुक्कामालाच आलाय, असा त्यांचा समज असतो. फास्ट लाइफमुळे क्षणभर थांबायलाही कोणाला वेळ नसतो. मग रस्त्याने जाताना एक बोट हॉर्नवर दाबलेलं ठेवूनच गाड्या चालवणारेही दिसतात. काहींचा तर असा समज असतो की आपण रागाने हॉर्न वाजवला की पुढचं खोळबलेलं ट्रँफिक एका क्षणात मोकळे होणार आहे.

शाळा, रुग्णालये, वृद्धाश्रम अशा ठिकाणहून जाताना कर्कश हॉर्न वाजवू नये, ही जाणीवच अनेकांना नसते. त्यामुळे जनजागृतीसाठी होणारा  हा कार्यक्रम गांभीर्यानेच घ्यायला हवा. वैयक्तिक प्रयत्न म्हणून आपल्यापैकी प्रत्येकाने सलग सात दिवस हॉर्न न वाजवता गाडी चालवण्याचा प्रयत्न केला तरी हा उपक्रम यशस्वी होईल आणि हॉर्न अत्यावश्यक परिस्थिती उद्भवल्यावरच वाजवावा, ही जाणीव वाढीस लागेल.

शैलेन्द्र परांजपे

Disclaimer:- ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER