
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकांना (Asha Workers) दिलेले कार्यमुक्तीचे आदेश तातडीने मागे घ्या, अशा स्पष्ट सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमन मित्तल यांनी दिल्या. आशा स्वयंसेविकांच्या प्रलंबित मागण्या आणि त्यांच्या मानधनाचा प्रश्नही तातडीने सोडवू, असे श्री. मुश्रीफ म्हणाले.
याबाबत अधिक माहिती अशी, कुष्ठरोग व क्षयरोग सर्वेसाठी प्रतिरुग्ण 50 रुपये एवढा मोबदला कमी वाटत असल्यामुळे आशा स्वयंसेविकानी हा सर्वेच नाकारला होता. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मित्तल यांनी जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकांना कार्यमुक्तीचे आदेश दिले होते. यामुळे संतप्त झालेल्या आशा स्वयंसेविकानी सेंटर ऑफ इंडिया ट्रेड युनियन म्हणजेच सिटू अंतर्गत कोल्हापूर जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियनच्या माध्यमातून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली व कैफियत मांडली.
यावेळी सिटूचे कार्याध्यक्ष काॅम्रेड चंद्रकांत यादव, जिल्हाध्यक्ष कॉम्रेड भरमा कांबळे, जिल्हा सहसचिव कॉम्रेड शिवाजीराव मगदूम, आशा युनियनच्या जिल्हा सचिव सौ. उज्वला पाटील, खजिनदार सौ. संगीता पाटील, सारिका पाटील, मंदाकीनी कोडक, माया पाटील, मनीषा पाटील यांच्यासह स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला