सरन्यायाधीशांचा ‘कायदे पंडित’ मानद उपाधीने सन्मान

नागपूर : सरन्यायाधीश शरद बोबडे यांना नागपूर विद्यापीठ मानद ‘कायदे पंडित’ (Kayade Pandit)उपाधीने सन्मानित करणार आहे. यासाठी ३ एप्रिलला विशेष दीक्षांत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना आमंत्रित करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. अशी माहिती कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी दिली. दीक्षांत समारंभासाठी राज्यपालांनीही सहमती दर्शवली आहे.

नागपूर विद्यापीठाने या आधी स्वातंत्र्यवीर सावरकर, बौद्ध धर्मगुरू दलाई लामा, गानसम्राज्ञी लता मंगेशकर, वक्ता दशसहस्रेषु राम शेवाळकर आदी मान्यवरांनाही मानद ‘वाङ्मय पंडित’ उपाधीने सन्मानित केले आहे. विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असलेल्या न्या. शरद बोबडे यांचेही नाव या यादीमध्ये जोडले गेले आहे. सरन्यायाधीश शरद बोबडे हे कायदेतज्ज्ञ असल्याने त्यांना या क्षेत्रातील ‘एलएलडी’ म्हणजे ‘कायदे पंडित’ या मानद उपाधीने सन्मानित केले जाणार आहे. यासाठी प्रशासनाने राष्ट्रपती कार्यालयाशी संपर्क साधला. लवकरच राष्ट्रपतींकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल, असा विश्वास कुलगुरूंनी व्यक्त केला.

सरन्यायाधीश बोबडे हे मूळचे नागपूरचे आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातुन कायद्याची पदवी घेतली आहे. त्यांचे योगदान हे नव्या पिढीकरिता आदर्श आहे. त्यांना मानद उपाधी प्रदान करून विद्यापीठाने माजी विद्यार्थ्यांचा सन्मान करावा, अशी मागणी गोवा येथील बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्रचे सदस्य अ‍ॅड. पारिजात पांडे तसेच विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER