राष्ट्रवादीच्या आमदारासाठी हनी ट्रॅप, शैलेश मोहितेची राष्ट्रवादीतून लवकरच हकालपट्टी?

honeytrap on NCP MLA - Maharastra Today

पुणे : पुणे जिल्ह्यातील खेड विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांना हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न झाल्याच पुढे आल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी संतप्त झाले आहेत. हे कटकारस्थान करणारे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस शैलेश मोहिते यांची हकालपट्टी करण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी उचलून धरली आहे.

खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि तालुक्यातील विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्याकडे ही मागणी उचलून धरली आहे. तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, खेड बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर, जिल्हा परिषद सदस्य अरुण चांभारे, सुखदेव पानसरे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

आमदार मोहिते यांनी दिवसरात्र मेहनत घेऊन, खेड तालुक्याचा संपूर्ण विकास केला. मात्र तरीही अशा विकासाभिमुख नेत्याला बदनाम करण्याचा घाट शैलेश मोहिते व राहुल कांडगे वारंवार घालत आहेत. चाकण मराठा मोर्चा आंदोलन आणि इतरही काही प्रकरणात त्यांचा खोटेपणा उघडकीस आला आहे. आताही सातारा येथील एका युवतीशी हातमिळवणी करुन धरून, पैशांचे व पुणे येथे फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून, आमदारांसाठी हनी ट्रॅप लावून बदनाम करण्याचे षडयंत्र डॉ. शैलेश मोहिते, राहुल कांडगे आणि सोमनाथ शेडगे या तिघांनी रचले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच या विश्वासघातकी लोकांची पक्षातून तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी त्यांनी पाठविलेल्या निवेदनात केली आहे.

या घटनेचा खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस जाहीर निषेध करीत असून, अशा प्रवृत्तीच्या लोकांमुळे पक्षाची प्रतिमा मलीन होते. त्यांची पक्षातून तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी, अन्यथा खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी राजीनामा सोपवतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button