कोरोनाने ‘हॉस्पिटल क्वारंटाईन’ होण्यापेक्षा स्वेच्छेने ‘होम क्वारंटाईन’ व्हा : अजित पवार

coronavirus-Ajit Pawar

मुंबई :- देशासह राज्यातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे राज्यातीलकोरोना ग्रस्त रुग्णांचा ३३८ वर गेला आहे. चिंतेची बाब म्हणजे राज्याच्या वैद्यकीय शिक्षण खात्याच्या अहवालानुसार, देशात आढळलेल्या एकूण करोनाग्रस्तांमध्ये २२ टक्के रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. देशाच्या तुलनेत राज्यात या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण १ टक्का अधिक आहे. यापार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला महत्वाचे आवाहन केले आहे .

“कोरोना पासून बचावासाठी ‘होम क्वारंटाइन’ किंवा ‘हॉस्पिटल क्वारंटाइन’ हे दोनंच पर्याय आज उपलब्ध आहेत.कोरोना संसर्गानं ‘हॉस्पिटल क्वारंटाइन’ होण्यापेक्षा नागरिकांनी स्वेच्छेने ‘होम क्वारंटाइन’ व्हावे, स्वत:चे आणि कुटुंबाचं संरक्षण करावे,” असे आवाहन अजित पवार यांनी जनतेला केले. “जे आज घरात थांबणार नाहीत ते काही दिवसांनी हॉस्पिटलमध्ये दिसतील,” असा इशारा त्यांनी दिला आहे.

कोरोनाच्या रुग्णात वाढ बेजवाबदारपणामुळे होत चालली आहे दिल्लीतील ‘मरकज’ घटनेपासून धडा घेऊन यापुढे कुठलाही सामुदायिक मेळावा आयोजित करु नये, त्याला परवानगी दिली जाणार नाही,” असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. “आज राज्यात रामनवमी भक्तीभावानं, साधेपणाने साजरी केल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी जनतेचे आभार मानले. तसेच यापुढेही सर्व सण, उत्सव साधेपणानं साजरे व्हावेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

भाजी बाजारातल्या गर्दीमुळे कोरोना तुमच्या घरात पोहचण्याचा धोका निर्माण झाला आहे. गावगुंडांकडून पोलिसांवर हल्ले होत आहेत. या समाजविघातक घटनांची शासनाने गंभीर दखल घेतली आहे. करोना संदर्भातील नियम मोडणाऱ्यांना तुरुंगाची हवा खावी लागेल. त्याची सुरुवात काल झाली आहे,” असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

“राज्य शासनाने आवाहन केल्यानंतर अनेक खाजगी डॉक्टरांनी त्यांचे दवाखाने, हॉस्पिटल सुरु केले आहेत, परंतु ज्यांनी त्यांचे दवाखाने अजूनही सुरु केलेले नाहीत त्यांची नोंद राज्य शासनाने आणि स्थानिक नागरिकांनी घेतली आहे. या डॉक्टरांवर निश्चित कारवाई केली जाईल,” असेही ते म्हणाले.

“राज्यात अन्नधान्याचा, खाद्यतेलाचा, दुध, भाजीपाल्याचा, औषधांचा, इंधनाचा मुबलक साठा आहे. या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कधीही बंद पडणार नाही. त्यामुळे खरेदीसाठी गर्दी करु नये, असेही अजित पवार म्हणाले.


Web Title : Home quarantine is better than hospital quarantine says ajit pawar

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)