गृहमंत्र्यांचे आभार ! पण त्यांनी ती पोस्ट शेअर करायला नको होती- रक्षा खडसे

Raksha Khadse & anil deshmukh

जळगाव :- भाजपाच्या खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांचा भाजपाच्या अधिकृत वेबसाईटवर आक्षेपार्ह उल्लेख आढळून आला होता. ही बाब एका महिला पत्रकाराच्या लक्षात आली. त्यांनी ट्विट करून ती बाब उघड केली. त्या महिला पत्रकाराच्या ट्विटवर तत्काळ दखल घेऊन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा दिला. ही मोठी चूक लक्षात आल्यानंतर भाजपनेही तत्काळ ती  सुधारली होती. मात्र, तोपर्यंत ते ट्विट वा-यासारखे सोशल मीडियावर पसरले. एवढेच नाही तर, गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही ते ट्विट त्या आक्षेपार्ह शब्दासह ट्विट केले होते.

या संपूर्ण बाबीवर आता रक्षा खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खासदार रक्षा खडसे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल त्यांचे आभार मानले. तसेच, राज्यातील प्रत्येक व्यक्तीच्या संरक्षणाची जबाबदारी गृहमंत्री म्हणून देशमुख यांची आहे, असेही त्या म्हणाल्या.

रक्षा खडसेंनी अनिल देशमुख यांच्याबद्दल नाराजीही व्यक्त केली; कारण देशमुख यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून त्या आक्षेपार्ह मजकूर असलेल्या फोटोसह ते ट्विट रिट्विट केलं होतं.

देशमुख यांनी तो आक्षेपार्ह मजकूर वगळून ट्विट करायला हवं होतं, ती पोस्ट शेअर करायला नको होती. गृहमंत्र्यांचं ते ट्विट मला खटकलं, असं रक्षा खडसेंनी स्पष्ट शब्दात सांगितलं.

राजकारणात चांगल्या आणि वाईट गोष्टीही घडत असतात.  या प्रकरणाचीही चौकशी होईल; पण देशातील कुठल्याही महिलेला बदनाम करण्याचं कृत्य सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून व्हायला नको, असंही रक्षा खडसेंनी म्हटलं आहे.

ही बातमी पण वाचा : मी पाहिले तेव्हा असे काही नव्हते, तो स्क्रीन शॉट व्हायरल करायला नको होता – रक्षा खडसे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER