मोहन डेलकर आत्महत्या गुन्हा नोंदवण्यासाठी गृहमंत्र्यांचा दबाव, परमबीर सिंग यांचा आरोप

Maharashtra Today

मुंबई : “दादरा-नगर हवेलीचे दिवंगत खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणात मी वारंवार परिस्थिती सांगून देखील आत्महत्येस उद्युक्त केल्याचा गुन्हा मुंबईत दाखल करण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुखांनी (Anil Deshmukh) दबाव टाकला. सर्व माहीत असून देखील या प्रकरणात स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम (SIT) ची स्थापना करण्याची आणि या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची घोषणा त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत ९ मार्च २०२१ रोजी केली”, असा आरोप परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवेल्या पत्रात केला आहे.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, सचिन वाझे प्रकरणात सरकार अडचणीत आले असताना गृहमंत्री अनिल देशमुख भाजपाच्या टीकेला उत्तर देण्यासाठी मोहन डोलकर आत्महत्या प्रकरणाचा (Home Minister pressures Mohan Delkar to register suicide case) ढालीसारखा उपयोग करत होते.

मुंबईत गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव

दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती. या प्रकरणावरून राज्यातील सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षात असलेल्या भाजपावर अनेकदा टीका देखील केली आहे. मात्र, याच प्रकरणात मुंबईत आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याचा दबाव गृहमंत्र्यांकडून टाकला जात होता, असा आरोप परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी केला आहे.

‘वर्षा’वर सर्व परिस्थिती मांडली होती”

“मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणात मुंबईत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याची पहिल्या दिवसापासूनच गृहमत्री अनिल देशमुख यांची इच्छा होती. याविषयी कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर माझ्यामते फक्त आत्महत्या इथे झाली असली तरी कथित आत्महत्येस उद्युक्त केल्याचा प्रकार हा दादरा-नगर हवेलीमध्येच झाला असावा. त्यामुळे असे काही झाले असेल, तर तो गुन्हा दादरा-नगर हवेलीतच दाखल व्हायला हवा होता आणि तिथल्याच पोलिसांनी त्याचा तपास करायला हवा होता. यावर ‘वर्षा’वर झालेल्या चर्चेदरम्यान मी माझं हे मत मांडल्यानंतर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा तपास दादरा-नगर हवेलीच्या पोलिसांमार्फतच व्हायला हवी यावर सगळ्यांचे एकमत झालं होते, असे परमबीर सिंग यांनी पत्रात म्हटलं आहे.

तरीही ऐकले नाही

यानंतरही गृहमंत्री अनिल देशमुख आपल्या मतावर ठाम होते. मी सातत्याने विरोध करत असल्यामुळे गृहमंत्री माझ्यावर नाराज होते. आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा मुंबईत दाखल केल्यामुळे राजकीय फायदा मिळणार नव्हता. पण हे सगळ माहिती असूनही गृहमंत्र्यांनी ९ मार्च २०२१ रोजी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्यासोबत आत्महत्येस उद्युक्त करण्याचा गुन्हा नोंद करण्याची घोषणा महाराष्ट्राच्या विधानसभेत केली”, असा दावा परमबीर सिंग यांनी पत्रात केला आहे.

ही बातमी पण वाचा : गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या बचावासाठी आघाडीतील कुणीच येत नाहीये समोर ? देशमुख पडलेत का एकाकी ? 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER