घर, पोलीस आणि कार्यकर्त्यांना धीर देणाऱ्या ‘होम मिनिस्टर’चे गृहमंत्र्यांनी केले कौतुक

Anil Deshmukh

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी त्यांच्या ‘होम मिनिस्टर’ला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. कोरोना काळात घराबाहेर असलेल्या पोलीस पतीच्या कुटुंबाला धीर देण्याचे डोंगराएवढे काम करणाऱ्या पत्नीचे त्यांनी कौतुक केले. अनिल देशमुख यांनी ट्विट केले आहे – “राज्याच्या गृहमंत्रिपदाची जबाबदारी पार पाडत असताना यात मोठा वाटा आहे माझ्या ‘होम मिनिस्टर’ अर्थात माझ्या सौ.चा. त्या घरची जबाबदारी चोख पार पाडत असल्यामुळेच मला राज्यात काम करण्याची मोकळीक मिळते. या कर्तव्यदक्ष ‘होम मिनिस्टर’ला आज वाढदिवसानिमित्त माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा.” ‘होम मिनिस्टर’चे कौतुक करताना ते म्हणाले – “राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर काही दिवसांतच कोरोनाची साथ आली. पाठोपाठ लॉकडाऊन सुरू झालं आणि त्यामुळे पोलिसांवर प्रचंड ताण आला. पोलीस दलाचा कुटुंबप्रमुख म्हणून पोलिसांच्या पाठीशी असल्याचा संदेश देण्यासाठी मला राज्यभर दौरे करावे लागले. कित्येक दिवस घरी जाता येत नव्हतं. दुसरीकडे कोरोनाचीही चिंता होती.

अशा कठीण काळात सौ.ने घरची आघाडी खंबीरपणे सांभाळली. यापूर्वीही सौ.च्या क्षमतेचा अनुभव असल्याने मलाही निर्धास्तपणे काम करता आले. पोलिसांच्या पाठीशी उभे राहता आले. माझ्या अनुपस्थितीत कार्यकर्त्यांच्या अडचणी सोडवणे , त्यांना काय हवे -नको ते पाहणे, घरी सुना-नातवंडांना आधार देणे ही जबाबदारी सोपी नव्हती. पण सौ.ने ती अगदी लीलया पार पाडली. ” असं अनिल देशमुख म्हणालेत. “आणखी एक गोष्ट मी कधीही विसरू शकत नाही, ती म्हणजे कोरोनाच्या काळात गृहमंत्री म्हणून पोलिसांच्या पाठीशी मी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व माझे इतर सर्व सहकारी ठाम उभे होतो. या काळात पोलीस अधिकाऱ्यांच्या कुटुंबाला, त्यांच्या पत्नीला २४ तास घराबाहेर असलेल्या आपल्या पतीची काळजी होती. ‘

अशा काळात त्यांच्याशी बोलून त्यांना धीर देण्याचे म्हटले तर डोंगराएवढे काम माझ्या सौ.ने केले. हे वाढदिवसाच्या निमित्त आज सांगताना मला मनोमन अभिमान वाटतो. माझ्या ‘होम मिनिस्टर’ला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा. जनसेवेसाठी त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो ही प्रार्थना.” अशा सदिच्छा त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER