
मुंबई : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी नववर्षाच्या पहिल्या दिवशी विविध तक्रारींसाठी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करणाऱ्या पुणेकरांना स्वत: उत्तर दिले . देशमुख यांनी आज सकाळीच पुणे पोलीस आयुक्तालयात हजेरी लावली. गेले दहा महिने डॉक्टर, नर्स, पोलीस सगळे जण कोरोनाविरोधात अथक लढा देत आहेत. त्यामुळे पोलीस दलाचा उत्साह आणि मनोधैर्य वाढवण्यासाठी गृहमंत्री पुण्यात गेले. यावेळी पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत केक कापत त्यांनी नवीन वर्षाचं स्वागत केलं. तसंच वायरलेसवरुन कर्मचाऱ्यांशी संवाद साधत शुभेच्छाही दिल्या. त्यानंतर नियंत्रण कक्षात जाऊन स्वत: काही फोन कॉल्सना उत्तरही दिलं.
यावेळी एका नागरिकाने सोयायटीमध्ये मोठ्या आवाजात गाणी वाजत असल्याची तक्रार करण्यासाठी नियंत्रण कक्षाला फोन केला. त्यावेळी तुमची तक्रार जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये कळवू असं उत्तर देशमुख यांनी सांगितलं. नियंत्रण कक्षात खुद्द गृहमंत्रीच फोन कॉल्सना उत्तर देत असल्याचं पाहून कर्मचारी आणि तक्रार करणाऱ्या पुणेकरांनाही आश्चर्याचा सुखद धक्का बसला.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला