गृहमंत्री अनिल देशमुख यांनी खुलासा करावा; भाजपा मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांची मागणी

Amit Shah - Anil Deshmukh

कालपासून समाज माध्यमांवर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या लेटरहेडवर लिहिलेले एक पत्र/प्रेस रिलीज/निवेदन फिरत आहे. सदर पत्र/प्रेस रिलीज/निवेदनाच्या सत्यतेबद्दल साशंकता असून त्यामुळे लोकांमधे संभ्रम
निर्माण झालेला आहे.

वृत्तपत्रे व प्रसार माध्यमांमधे काम करणाऱ्या काही मंडळींचा असा दावा आहे की हे पत्र/प्रेस रिलीज/निवेदन हे गृहमंत्र्यांच्या कार्यालयामार्फत त्यांना पाठवले गेले आहे तर काही प्रसार माध्यमे हे पत्र खोटे अथवा बनावट असल्याचा दावा करत आहेत.

प्रथम दर्शनी ते पत्र/प्रेस रिलीज/निवेदन हे खोटे असल्याचे भासते. त्यातील भाषा बघता ती सरकारी किंवा औपचारिक भाषा नसून अतिशय अनौपचारिक भाषेत ते लिहिले गेले आहे. ते कोणा प्रति लिहीले आहे किंवा प्रेस रिलीज असल्यास ‘प्रसिद्धीसाठी’ असेही त्यात लिहिण्यात आलेले नसल्याने ते पत्र/प्रेस रिलीज/निवेदन यापैकी नेमके काय आहे हे कळत नाही आणि त्यामुळे त्याबाबतचा संभ्रम अधिकच वाढत आहे.

जर सदर पत्र/प्रेस रिलीज/निवेदन खोटे असेल तर हा एक गंभीर गुन्हा आहे आणि सदर गुन्हा जर राज्याच्या गृहमंत्र्यांच्या बाबतीत घडत असेल तर ती अधिकच गंभीर बाब आहे.

त्यामुळे या विषयात महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लवकरात लवकर खुलासा करावा. तसेच सदर पत्र/प्रेस रिलीज/निवेदन खोटे असल्यास त्यासंबंधी कायदेशीर कारवाई करण्यात यावी.