गृहसौख्य, तंदुरुस्ती…ज्याचा त्याचा प्रश्न

गृहसौख्य, तंदुरुस्ती...ज्याचा त्याचा प्रश्न

Shailendra Paranjapeजागतिक आरोग्य संघटनेने (WHO) (म्हणजेच डब्लूएचओ किंवा हू) करोना (Corona) काळात आहाराकडे विशेष लक्ष द्या, असं आवाहन केलंय. मुळात करोना काळात लॉकडाऊन (Lockdown) अनलॉकपर्व अशा भीतीच्या वातावरणात सर्वसामान्यांची धावपळ असते ती जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा पुरवठा आपल्या घरात आहे की नाही, याची खातरजमा करण्याची.

त्यामुळेच एरवीच्या दैनंदिन वापराच्या गरजेच्या वस्तू जमवताना आहारातली पोषक द्रव्यं किंवा घटक यांकडे तितकेसे लक्ष दिले जात नाही. बाजारात दुकानात मंडईत आणि सार्वजनिक ठिकाणी गर्दी होत असेल तर मग भाजी जीवनावश्यक वस्तू हे सारं विकत आणायचं म्हणजे करोनाला निमंत्रण, अशी स्थिती होती.

जागतिक आरोग्य संघटनेच्या आहाराकडे पोषणमूल्यांकडे लक्ष द्यावं, या आवाहनाबरोबरच स्थानिक वृत्तपत्रांतून काही संस्थांच्या सर्वेक्षणांच्या बातम्याही प्रसारित झाल्यात. त्या जागतिक आरोग्य संघटनेच्या आवाहनाशी जोडून बघायला हव्यात. त्यातल्या काही सर्वेक्षणांमधून करोना काळात जास्ती काळ घरी राहिल्यामुळे अनेकांना चिडचिड होण्यासह अनेक प्रकारच्या मानसिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्याबरोबरच पोषणमूल्य असलेले आहारही काही संस्थांनी तज्ज्ञांनी सुचवलेले आहेत. त्याकडेही लक्ष द्यायला हवे.

ही बातमी पण वाचा : हे तर मरणाऱ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्यासारखे…

करोनाच्या लसविकसनाला किमान जानेवारी ते मार्च २०२१ नक्कीच उजाडणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार मार्च २०२१ला करोनाची लस विकसित झाली तरी ती सर्व भारतीयांना लगेचच उपलब्ध होणार नाही. ती सुरुवातीला करोना योद्धे म्हणजे डॉक्टर्स तसंच निमवैद्यकीय कर्मचारी आणि सफाई कर्मचाऱ्यांसह अन्य कोविड योद्धे, पोलीस कर्मचारी-अधिकारी यांना दिली जाईल. याचा अर्थ सर्वसामान्य नागरिकांना लस टोचली जाईल ती मार्च २०२१नंतरच. तसं असेल तर येत्या सहा महिन्यांमधे आपापली प्रकृती सांभाळण्यासाठी दैनंदिन व्यवहार, आहार विहार यांकडे लक्ष देतानाच तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, हेही लक्षात ठेवावं लागणार आहे.

भारतीय जेवण किंवा पुणे, महाराष्ट्र यांपुरते बोलायचे झाल्यास आपले पोळी भाजी भात डाळ किंवा आमटी हे महाराष्ट्रीय जेवण चौरस आहारच आहे. जेवणात डाळी, सामिषप्रेमी असल्यास अंडी वा मांसाहार हेही जागतिक आरोग्य संघटनेने सुचवलेले आहे. तेवढे रोज नीट खाल्ले तरी पुरे.

काही सर्वेक्षणांनुसार वर्क फ्रॉम होम याचेही काही दुष्परिणाम जाणवू लागलेले आहेत. त्यामधे सतत घरात राहिल्याने आणि त्याच त्याच व्यक्तींना सारखं सारखं समोर भेटल्यानेही काही समरप्रसंग, वादविवाद चिडचिड अशा गोष्टी अनुभवायला येऊ लागल्यात. त्यावरही चौरस आहारासह नियमित व्यायाम आणि व्यायामामधे दैनंदिन चालण्याचा व्यायाम उपयोगी ठरू शकतो. अर्थात, आरोग्याच्या तक्रारी असल्यास किंवा रक्तदाब, हृदरोग, मधुमेह असे कोणतेही रोग असल्यास किंवा निरोगी नसल्यास व्यायाम करताना डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

नियमित व्यायाम, घरच्यांनाही थोडा वेळ का होईना आपला चेहरा पाहण्यापासून मुक्ती देणं, यासारख्या उपायाचा उपयोग घरातले वादप्रसंग टाळण्यासाठी होतो, असे अनेक मित्र सांगताहेत. तीच गोष्ट घरातल्या सर्वच सदस्यांना किमान थोडा वेळ का होईना, घराच्या बाहेर म्हणजे गच्ची असेल, बिल्डिंगचे पार्किंग असेल किंवा जवळचे मैदान टेकडी किंवा अगदी सकाळी सकाळी गर्दी नसताना खुला रस्ता असेल, तर थोडा वेळ चालायचा व्यायामही करोना काळात रिलीफ नक्कीच देऊ शकेल. काहींना पती पत्नी एकत्र गप्पा मारत वॉक घ्यायला आवडतं आणि या चालण्यात ते अनेक वादविषय सोडवत असतात तर काहींना एकेकटे चालून फ्रेश वाटतं.

करोना काळात वाद टाळणं, चिडचिड टाळणं हे सारं करताना ब्रिटिशांना आलेला नेटिव्ह इनोव्हेटिव्ह आहेत, हा अनुभव कोणत्याही घरातल्या गप्पा ऐकल्या की लक्षात येईल. त्यातले काहीही अंगीकारा पण करोनाला दूर ठेवा आणि त्यासाठी सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सँनेटाझर किंवा हात वारंवार धुणे याला मात्र पर्याय नाही.  बाकी आहार किंवा व्यायाम आणि घरातलं सौख्य याबाबत सांगायचं तर यातले विविध पर्याय म्हणजे ज्याचा त्याचा प्रश्न आणि तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार…

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER