होळकरांचा किल्ला अन् आता राष्ट्रवादीतूनच हल्ला

Yashwantrao Holkar - Dr. Archana Patil Letter To Sharad Pawar

राज्यच नव्हे तर देशातील धनगर समाजाचे श्रद्धास्थान म्हणजे होळकर घराणे.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या तर धनगरांसह समस्त ओबीसी, बाराबलुतेदार समाजाच्या अपार श्रद्धेचा विषय. अहिल्यादेवी, मराठा साम्राज्याचे संस्थापक मल्हारराव होळकर, राजे यशवंतराव होळकर (Yashwantrao Holkar), राजे तुकोजी होळकर यांचे वास्तव  पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या वाफगाव येथे असलेल्या किल्ल्यात. अनेक वर्षे होळकर घराण्याचा कारभार याच किल्ल्यातून चालत असे. हा किल्ला रयत शिक्षण संस्थेने (Rayat Shikshan Sanstha) १९५५ मध्ये आपल्या ताब्यात घेतला. सरकारकडे त्यावेळी त्यांनी अशी लेखी कबुली दिली की या मूळ ऐतिहासिक वास्तूची जपणूक करू. आज या किल्ल्याची पार वाताहत झाली आहे आणि समस्त धनगर समाजाच्या (Dhangar Community) अस्मितेचा विषय असलेल्या या किल्ल्याच्या दुरावस्थेबद्दल आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) असलेले धनगर समाजाचे नेतेअस्वस्थ होऊन बोलू लागले आहेत. एवढेच नव्हे तर रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष असलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनाच त्यांनी खरमरीत पत्र लिहून तीव्र नाराजी बोलून दाखविली आहे.

श्रीमंत महाराज यशवंतराव होळकर स्मारक संवर्धन समितीच्या प्रमुख सल्लागार आणि राष्ट्रवादी महिला आघाडीच्या सातारा जिल्हा निरिक्षक डॉ.अर्चना पाटील (Dr. Archana Patil), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) दौंड तालुक्याचे निरिक्षक आणि स्मारक समितीचे प्रमुख सल्लागार बापुराव सोलनकर, समितीचे महासचिव भगवान जराड, स्मारक समितीचे कोषाध्यक्ष योगेशराजे होळकर, कार्याध्यक्ष नवनाथ बुळे सरकार यांनी हे पत्र शरद पवार यांना लिहिले आहे. पत्रात म्हटले आहे की, या ऐतिहासिक किल्ल्याची जपणूक करण्याचे रयत शिक्षण संस्थेने मान्य केल्यानंतरच ही वास्तू संस्थेला देण्यात आली होती. मात्र, तिचे जतन करण्यात रयत शिक्षण संस्था कमी पडली आहे. मूळ वास्तूचे पावित्र्य भंग करून त्या ठिकाणी नवीन इमारती, शौचालय आणि इतर बांधकामे रयत शिक्षण संस्थेने केली. त्यामुळे किल्ल्याचे पावित्र्य धोक्यात आले आहे. हा किल्ला यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थान असल्यामुळे धनगर समाजाच्या अस्मितेचा विषय आहे. राज्यातील सर्वच राजकीय पक्षांकडून होळकर घराण्याच्या वास्तू दुर्लक्षित राहिल्यामुळे धनगर समाजात कमालीची अस्वस्थता आहे. पवार साहेब! आपण रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहात. आपण स्वत: यात लक्ष घालून रयत शिक्षण संस्थेची शाळा अन्यत्र हलवून किल्ल्याचे जतन करावे. अर्चना पाटील यांनी या पत्रात म्हणतात की मी स्वत: राष्ट्रवादीची पदाधिकारी आहे. आम्हाला आमचा समाज या किल्ल्याविषयी प्रश्न करतो. तेव्हा ही शाळा किल्ल्यातून हलवावी. हा किल्ला राज्य सरकारने स्वत:च्या ताब्यात घ्यावा आणि त्या ठिकाणी स्मारक घोषित करावे. या किल्ल्याच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने ५० कोटी रुपयांची तरतूद करावी, अशी धनगर समाजाची मागणी असल्याचे या पत्रात म्हटले आहे. शरद पवार आता या पत्राची कशी दखल घेतात या बाबत धनगर समाजात उत्सुकता आहे.

डाॅ. अर्चना पाटील यांचे शरद पवारांना पत्र

ही बातमी पण वाचा : ‘शरद पवारच मोदी सरकारला उखडून फेकतील’, उत्तर प्रदेशातील काँग्रेसच्या जेष्ठ नेत्याचे मोठे विधान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER