होळी – आपले सण व आरोग्यशास्त्र

Holi - Our Festival and Health

हिंदू सण नेमके त्या त्या ऋतुमधील वातावरणाचा शरीरावर होणाऱ्या परीणामांचा विचार करूनच आहेत. शरीरावर बदलत्या ऋतुचा दुष्परीणाम होऊ नये या दृष्टीने आहार विहार योजना बदलल्या जाते. त्या ऋतुमधील उपलब्ध हितकर भाज्या धान्य याचा नैवेद्य म्हणून वापर केला जातो. आपले सण पूजा यांना धार्मिक पार्श्वभूमि तर आहेच त्यासोबतच हे सण मनुष्य, निसर्गाचे आरोग्य व समतोल टिकविण्याच्या दृष्टीने आहेत हे आपल्या लक्षात येते.

होळी (Holi) हा सण देखील त्यापैकीच. दुष्ट शक्तिंचा नायनाट होवो याकरीता होळी पेटवली जाते. ऋतुसंधीचा हा काळ असल्याने अनेक संसर्ग होण्याची शक्यता या काळात असते. कफाचे व्याधी या काळात होतात. होळीकरीता गाईच्या शेणाच्या गोवऱ्या, भिमसेनी कापूर, तूप, कडूलिंबाच्या वाळलेल्या काड्या पानं, वेखंड अशा रक्षोघ्न द्रव्यांचा वापर केला जातो. याचा धूर कफ कमी करणारा, जंतुनाशक असल्यामुळे वातावरणातील आणि शरीरातील जंतुनाशन कफनाशन कार्य घडते.

नैवेद्याकरीता होळीच्या दिवशी लाह्याचा उपयोग होतो. लाह्या पचायला हलक्या, कफ मेद कमी करणाऱ्या असल्यामुळे या काळात हलके अन्न घेण्याकरीता उत्तम पर्याय आहे. स्थूल, प्रमेह असणाऱ्या व्यक्तींकरीता लाह्या खूप उपयोगी आहेत.

होळीच्या दिवशी अनेक जण उपवास करतात. या लंघनामुळे दोषांचे पाचन होते. शरीर हलके होते. कफव्याधी, ज्वराची ही उत्तम चिकित्सा आहे.

“होळी रे होळी पुरणाची पोळी” असे आपण म्हणतो. या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य होळी पेटल्यावर दाखवितात. पुरणपोळी ही चणाडाळ, साखर गुळ, कणिक यापासून बनते. ही पचायला जड वातुळ असल्यामुळे तुपाची धार यावर असणे आवश्यक आहे. सोबत पाचक मसाल्यानीयुक्त कटाची आमटी हा संयोग पाचनसंस्था सांभाळून घेते. होळी पेटल्यावर हा पुरणाचा नैवेद्य अर्पण केला जातो. थंडी सरून ग्रीष्म ऋतुची सुरवात असते. येणाऱ्या ऋतुत जठराग्नि मंद होणार, पाचनशक्ति मंदावणार त्यामुळे होळीला अर्पण केलेला हा पुरणाचा नैवेद्य म्हणजे यापुढे काही महिने असे जड वातुळ पदार्थ तुर्तास बंद! ऋतुनुसार पुन्हा आहार विहाराची योजना करण्याची गरज हा त्यामागचा विचार.

असा हा होळीचा सण सर्वांनी त्याचे शास्त्र समजून साजरा करावा. केमिकल्सचा होळी पेटविण्यास वापर न करता आरोग्य, निसर्ग हितकर द्रव्यांचा वापर करून होळी साजरी करावी. सर्वांना जेरीस धरलेल्या कोरोनाचे होळीच्या पवित्र अग्नित दहन होवो.

ayurveda

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button