रंगांची उधळण म्हणजे होळी सण !

Holi Festival 2021

होळी (Holi) हा महाराष्ट्रातील मोठा सण आहे, याला कोकणात शिमगा म्हटले जाते. होळी म्हणजे रंगांची उधळण, होळी म्हणजे प्रेम आणि स्नेहमिलनाचा दिवस. साखरेच्या गाठीचा गोडवा आणि रंगांच्या पिचकारीने आपसातील मतभेद विसरून एकत्र येण्याचा दिवस. होळी हिंदूंचा सण मानला जातो. होळी म्हणजे सत्याचा असत्यावर विजय. होळी हा दोन दिवसांचा सण आहे. फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या सायंकाळी याची सुरुवात होते. होळीच्या सणामागे आजच्या वेळेनुरूप अशी शिकवण आहे. होळीच्या दिवशी होलिका राक्षसणीचा वध झाला, हिरण्यकश्यपूचा बेत फसला, चांगल्याचा वाईटावर विजय झाला.

आजच्या या जगात जिथे गुन्हे, चोऱ्या, भ्रष्टाचार वणव्यासारखा पसरतोय तिथे होळीचा संदेश आपणास आशा देऊन जातो. सरतेशेवटी सत्यच जिंकणार. होळी सण वसंतऋतूच्या स्वागतासाठीसुद्धा साजरा केला जातो. झाडे, झुडपे असह्य उन्हाळा आणि हिवाळा सोसून वसंताची वाट पाहात असतात. वसंतामध्ये नवी पालवी फुटते, त्यांची वाढ होते, रंगबेरंगी फुले उमलतात, वातावरण खूप आल्हाद असते. माणसाचे आयुष्यही असेच असते, कधी सुख तरी कधी दुःख, कधी आराम तर कधी मेहनत. होळी आपल्याला शिकवते की अंधाऱ्या समयी टिकून राहायचे असते आणि सकाळच्या सूर्यकिरणांची वाट पाहायची असते.

प्रत्येक रात्रीनंतर दिवस येतोच. होळी पुरातन काळापासून साजरी केली जाते; पण होळीचा संदेश आजही तितकाच संबंधित आहे. होळीला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला जातो, होळी कुठल्या एक धर्माची नाही तर ती सर्व मानवजातीची आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button