मल मूत्रादि नैसर्गिक वेगाचे धारण अनेक रोगांना आमंत्रण !

लहान लहान मुलं एखादेवेळी टीव्ही, मोबाईलवर आपला आवडता कार्यक्रम बघत असतात वा खेळण्यात इतके दंग असतात की, तो सोडून जायचा ते कंटाळा करतात. सू (Su) किंवा शी(Shee) लागली तरी ते दाबून ठेवतात किंवा अगदी असह्य होऊन पळत पळत बाथरूम गाठतात. हा किस्सा अनेकांच्या घरात घडत असेल. मुलांना समजवितो वा रागवून सांगितले जाते की, अरे असे सू/शी थांबवू नये, बरोबर ना! बरं हे लहान मुलांमध्येच होते का? तर मुळीच नाही. अभ्यास पूर्ण झाल्यावर जाऊ, एखादे काम संपल्यावर जाऊ असा विचार करणारे, शरीरस्वास्थ्य विसरून प्रोजेक्ट पूर्ण करणारे, मीटिंग सोडून जाता येत नाही अथवा जागा योग्य नाही, लाज, भीती किंवा अस्वच्छता अशा अनेक कारणांना अनेक जण सामोरे गेले असतील.

अनेक स्त्रिया रडू येत असेल तरीही मनात साठवतच राहतात. लहान मुलांना रागवितो वा मारले व ते रडत असतील तर रडू नको म्हणून अजून रागवतो. मग ते भीतीपोटी अश्रुवेग दाबतात. या वेगविधारणाचा शरीरावर काय परिणाम होतो? आयुर्वेदशास्त्र यावर काय सांगते. बघूया – आयुर्वेदशास्त्रात नैसर्गिक वेग धारण केल्याने शरीरावर काय परिणाम होतो, त्यामुळे काय व्याधी उत्पन्न होतात यावर एक स्वतंत्र अध्याय संहितेत लिहिला आहे. एक पूर्ण अध्याय ! विचार करण्यासारखी गोष्ट आहे. किती खोल परिणाम होत असेल या वेगविधारणाचा ! एक प्रश्न पडला असेल की, वेग ही संज्ञा का वापरली असेल? वेग म्हणजे जोराचा प्रवाह. उदा. नदीचा प्रवाह.

वेग थांबविण्याचा प्रयत्न केला तर काय होते? तर त्या भिंतीवर आदळून पाण्याचा प्रवाह उंच उसळून पुन्हा मागे जोरात जातो. त्याच प्रकारे शरीरात मलमूत्र, अधोवायू, वांती, ढेकर, जांभई, भूक, तहान, निद्रा, व्यायामादी परिश्रम केल्यानंतर लागणारा दमश्वास, शुक्र( वीर्य),अश्रू, शिंक असे १३ वेग शरीरातून बाहेर पडण्याकरिता प्रवृत्त होतात; पण त्याला अडकविल्यास एकतर अन्य कोणत्या मार्गाने निघतात; अन्यथा नाही बाहेर पडता आले तर शरीरात आजार निर्माण करतात. उलटी किंवा वांती आली तर त्याचा वेग जास्त असतो हे आपण अनुभवले असेल. आपण तोंडावर हात ठेवून थांबविण्याचा प्रयत्न केला तर नाकातून तोंडातून जोरात द्रव्य बाहेर पडते व डोळे लाल होणे, नाकात, घशात आग होणे, अन्नकण अडकणे असा त्रास होतो हे कधीतरी अनुभवले असेल बऱ्याच जणांनी.

तसेच घडते इतरही वेगांबाबत. आचार्यांनी म्हटले आहे – रोगाः सर्वे अपि जायन्ते वेगोदीरणधारणैः। अर्थात नैसर्गिक वेगांना जबरदस्तीने उत्पन्न करणे (उदीरण) किंवा धारण ( अडकविणे) हे अनेक व्याधी निर्माणाचे मूळ आहे. म्हणूनच वेगान् न धारयेत् । या १३ वेगांना धारण केल्याने त्या त्या वेगानुसार व्याधी निर्माण होतात.

त्यानुसार चिकित्सा केली जाते. उदा. झोप येत असूनही न झोपल्याने डोके, डोळे जड पडणे, अंगदुखी, चक्कर, भ्रम, जांभया येणे अशा तक्रारी दिसतात. यावर छान सर्वांगाला मालीश करून झोप घेणे हा उपाय फायदेशीर ठरतो. रडू येत असूनही अश्रुवेग अडविल्यास नाकातून सतत पाणी येणे, डोळे, डोके, छातीत दुखणे, भोजनाची इच्छा न होणे, चक्कर, मान जकडणे अशा तक्रारी निर्माण होतात.

शिंक येत असल्यास ती दाबल्याने अर्दीत (facial paralysis) होऊ शकतो. यावरून नैसर्गिक वेग धारणाची गंभीरता लक्षात येईल. अशा प्रकारे नैसर्गिक वेगांचे धारण किती नुकसान करू शकते हे लक्षात घेणे गरजेचे आहे. मलमूत्रादी वेग उत्पन्न झाल्यावर दुसरे काहीच काम करू नये. सर्वांत आधी त्या उत्पन्न वेगाचा परित्याग करावा, वेळीच उपचार करावा. चरकाचार्य म्हणतात – इच्छंस्तेषामुनुत्पत्तिं वेगानेतान्न धारयेत् |

ayurveda

 

 

 

 

 

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER