
वेस्ट इंडिजचा (West Indies) कर्णधार जेसन होल्डर (Jason holder) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुन्हा तटस्थ पंच नेमणे सुरु व्हायला हवे असा आग्रह धरला आहे. कोरोनाच्या (Corona) साथीमुळे सध्या यजमान देशातील पंचच नेमण्यात येत आहेत. वेस्ट इंडिजच्या संघाने न्यूझीलंडमधील (New zealand) कसोटी मालिका गमावली असली तरी त्याची या मालिकेतील पंचगिरीबाबत (Umpires) कोणतीही तक्रार नाही, पण आता खेळाडू दौरे करायला लागलेत, परदेशात खेळायला लागलेत तसा पंचांनीसुध्दा प्रवास करायला हवा असे मत त्याने मांडले आहे.
त्याच्या मते सामन्यात खेळणाऱ्या दोन्ही देशांचे पंच नेमले जाणे ही अधिक संतुलीत बाब ठरेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) ने 26 वर्षांपूर्वी तटस्थ पंचांची पध्दत सुरु केली आहे. परंतु कोरोनामुळे सर्व विस्कळीत झाल्यानंतर आणि प्रवासावर बंधने आल्यामुळे आयसीसीने स्थानिक पंच व स्थानिक सामनाधिकारी नेमण्यास सुरुवात केली आहे.
होल्डर म्हणतो की प्रत्येक मालिकेत काही निर्णयाबद्दल समाधान नसतेच पण ताज्या मालिकेत न्यूझीलंडच्या पंचांनी चांगली कामगिरी बजावली. परंतु आता जर खेळाडू प्रवास करु शकतात आणि क्वारंटीन होऊ शकतात, तर मग पंच का नाही हे करु शकत, असा सवाल त्याने केला आहे. खेळाडू धोका पत्करुन क्रिकेट खेळत आहेत तर पंचसुध्दा ते करु शकतात.त्यांनी तसे करायला हवे अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला