गॅब्रिएल व ब्लॅकवूडवर होल्डर खूश, स्टोक्सने केले आपल्या निर्णयाचे समर्थन

Holder praises gabriel and blackwood

पहिल्या कसोटीत इंग्लंडवरील विजयानंतर वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डरने सामनावीर ठरलेला गोलंदाज शॅनन गॅब्रियलची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे. या 32 वर्षीय जलद गोलंदाजाने सामन्यात 137 धावात 9 बळी मिळवून विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. विशेष म्हणजे शॅनन अलीकडेच घोट्याच्या शस्रक्रियेला सामोरा गेलेला असल्याने त्याची केवळ राखीव खेळाडू म्हणून या दौऱ्यावर निवड झाली होती. पण दोन सराव सामन्यात त्याने आपला फिटनेस सिध्द केला आणि कसोटी संघात स्थान मिळवले.

शॅनन हा फार मोठ्या मनाचा माणूस आहे असे कौतुक करताना शॅननने या सामन्यात जी कामगिरी केली ती मूळीच आश्चर्यजनक नव्हती असे होल्डरने म्हटले आहे. होल्डरच्या म्हणण्यात तथ्यसुध्दा आहे कारण गॅब्रियलच्या नावावर 46 सामन्यात 30 पेक्षा कमी सरासरीने 142 बळी आहेत.

तो अशा व्यक्तींपैकी आहे जे सतत चांगले काम करतच राहतात. त्याने बरेच काही सोसले आहे म्हणून त्याला यशाची खूप गरज होती. त्याला पुन्हा पूर्वीच्याच जोमाने गोलंदाजी करताना बघणे आनंददायी होते. या सामन्यात मिळालेल्या यशाचा तो सर्वार्थाने हक्कदार होता असे होल्डरने म्हटले आहे.

विंडीजच्या विजयात ज्या दुसऱ्या खेळाडूची कामगिरी महत्त्वाची ठरली तो म्हणजे जर्मेन ब्लॅकवूड. त्याच्या 95 धावांच्या खेळीने इंग्लंडला पहिले चार गडी झटपट गमावल्यावर 200 धावांचे लक्ष्य गाठता आले. डॕरेन ब्राव्हो व शिमरोन हेटमेयरने कोरोनाच्या भीतीने या दौऱ्यावर येण्यास नकार दिला नसत तर कदाचित ब्लॕकवूडला ही संधीसुध्दा मिळाली नसती.

प्रथम श्रेणीत त्याची कामगिरी दमदार होती. त्यामुळे संघातील स्थानाचा तो दावेदार होताच. आता अशीच कामगिरी तो पुढेही सुरू ठेवेल अशी आशा होल्डरने व्यक्त केली आहे.

दुसरीकडे इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने या सामन्यासाठी स्ट्युअर्ट ब्रॉडला वगळण्याचा आणि ढगाळ हवामानात गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टीवर प्रथम फलंदाजीचा निर्णय चुकीचा होता असे अजुनही वाटत नसल्याचे म्हटले आहे. आठ वर्षात प्रथमच ब्रॉडला संघाबाहेर बसावे लागले होते आणि त्याबद्दल त्याने आपली नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली होती. जर ब्रॉडला वगळण्याचा निर्णय चुकला असे मी म्हटले तर ज्या खेळाडूंना निवडले होते त्यांच्यासाठी ते चुकीचे ठरेल.

दुसऱ्या कसोटीत नियमीत कर्णधार जो रुट सुत्रे सांभाळेल अशी ब्रॉडला आशा आहे. दुसऱ्यांदा पिता बनल्याने रुटने या सामन्यात खेळायचे टाळले होते.

चौथ्या डावात आम्ही विंडीजला दोनशेच धावांचे आव्हान देऊ शकलो ही धावसंख्या पुरेशी नव्हती असेही स्टोक्सने म्हटले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीच्या निर्णयाला योग्य ठरवत तो म्हणाला की, पहिल्या डावातील धावा महत्त्वाच्या ठरतात. आम्ही 400 च्या वर धावा केल्या असत्या तर स्थिती वेगळी राहिली असती. पण आमचे फलंदाज व तरुण खेळाडूंना या सामन्यातून भरपूर शिकायला मिळाले असे स्टोक्सने म्हटले आहे. दुसऱ्या डावात विंडीजची 4 बाद 100 स्थिती असताना आम्ही फायदा उचलू शकलो नाही असे तो म्हणतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER