जिभा सांभाळा, अंत बघू नका…

Chandrakant Patil & Sanjay Raut

Shailendra Paranjapeराज्य सरकारची वर्षपूर्ती, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची संपलेली रणधुमाळी आणि त्या अनुषंगाने झालेले शाब्दिक युद्ध आठवडाभर गाजताहेत. सोशल मिडियावरही त्याची चर्चा झालीय. राजकारणाचा स्तर दिवसेंदिवस अधिकाधिक घसरत चालला आहे आणि त्यामुळेच अनेकदा नेतेमंडळींची विधानं व्हायरल झाली आणि ते ट्रोल होऊ लागले की खुलासे-प्रतिखुलासे द्यावे लागतात. आता तर ट्रोल आर्मीही तैनात केल्या जाऊ लागल्यात. त्यामुळेच नेटकरी, सोशल मिडियावर अनावश्यक सक्रीय असलेल्यांचा मात्र गोंधळ उडू लागलाय.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर केलेली टीका आणि त्यानंतर झालेले वाग्युद्ध गाजले. तसंच राज्य सरकारला म्हणजे राज्यातल्या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीला एक वर्ष पूर्ण झाल्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नेहमीप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची घेतलेली मुलाखतही गाजली. उद्धव ठाकरे नेहमीप्रमाणे बोलले आणि नेहमीप्रमाणे त्यांनी केलेल्या कामाबरोबरच विरोधी पक्षांना धमकावण्याचेही काम केले. आपण मी पुन्हा येईन, असं न म्हणताही इथपर्यंत पोहोचलो, अशा शब्दात त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावरही टीका केली.

राजकारणात यशस्वी होण्यासाठी डोक्यावर बर्फ, पायात भिंगरी आणि तोंडात साखर असावी लागते, असं जुने जाणते नेते सांगतात. कायम थंड डोक्याने काम करावं, शांत रहावं, संयम ठेवावा. तसंच सतत फिरावं आणि तोंडावर नियंत्रण असावं हेही सांगितलं जातं. नेमकं तेच सध्या सुटत चालल्याचं दिसतंय.

कोणा एका विशिष्ट पक्षाबद्दल हे घडतंय असं नाही तर एकूणच राजकारणाचा दर्जा घसरताना दिसतोय तसाच अनेकांच्या जिभेचा तोलही सुटल्याचं दिसतं. त्याचं कारणही तेच आहे. एक तर सोशल मिडियावरचं, व्हाट्स अँपवरचं, ट्विटरवरचं बोललेलं लिहिलेलं म्हणजे साधे छोटे इलेक्ट्रॉनिक सिग्नलच असल्यानं शब्द बापुडे केवळ वारा….इतकंच त्यांना महत्त्व आहे. बरं या सर्व मंडळींचा पब्लिक मेमरी इज शॉर्ट अर्थात लोक काही काळानं विसरून जातात, या वचनावर जरा जास्तीच विश्वास आहे.

पण भारतात लोकशाही सशक्त असण्याचं एकमेव कारण लोक सहजासहजी विसरत नाहीत, हेच आहे. मुकी बिचारी जनता कुणीही हाका, अशी वाटत असली तरी योग्य वेळी जनता सर्वांनाच रस्ते दाखवते, हे वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे अगदी निवडणुकीच्या प्रचाराच्यामुळे जरी जिभा सैल सोडल्या असल्या तरी जनता जनार्दन हे सारं लक्षात ठेवत असतेच.

कुणाचा अभ्यास आहे, कोण कुणाच्या घरच्यांबद्दल काय बोलतंय, कोण कुणाला चंपा, जपा, उठा म्हणतंय हे सारं काळाच्या पटलावर तर नोंदवलं जातंच आहे पण जनतेच्या मनातही हे सारं राहतंच. जनता योग्य वेळेची निवड करत असते आणि त्यामुळेच कुणाची कवचकुंडलं केव्हा उतरतील, याचा नेम नसतो याचं भान सगळ्याच अतिरथी महारथींनी ठेवायला हवं.

राजकारणात किमान सभ्यता पाळायला हवी कारण महाराष्ट्राची संस्कृती इतर राज्यांपेक्षा वेगळी आहे. महाराष्ट्राला संतपरंपरेचा वारकरी संप्रदायाचा वारसा आहे. त्यामुळे मुळात संयमी असलेल्या गरीब बिचाऱ्या जनतेचा अंत राजकीय नेत्यांनी बघता कामा नये नाही तर जनतेची लाठी अशी चालेल की आवाज येणार नाही पण अंत ठरलेलाच असेल.

शैलेन्द्र परांजपे

Disclaimer :-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER