काँग्रेसला फटका, तर भाजपाचा हुकमी एक्का; वरिष्ठ नेते जितीन प्रसाद यांचा भाजपात प्रवेश!

Jitin Prasad - Maharashtra Today

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांच्या आधीच काँग्रेसला चांगलाच फटका बसला आहे. युपीए-२च्या काळात केंद्रात मंत्रीपदी राहिलेले उत्तर प्रदेशमधील वरीष्ठ नेते जितिन प्रसाद यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आणि भाजपामध्ये प्रवेश केला. दिल्लीमधील भाजपाच्या मुख्यालयात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत जितिन प्रसाद यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. भाजपाचे खासदार अनिल बलूनी यांनी जितिन प्रसाद भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे ट्विट केले होते.

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत जितीन प्रसाद यांनी भाजप मुख्यालयात पक्षप्रवेश केला. यावेळी, काँग्रेसचे आभार मानतानाच त्यांनी भाजपचेही कौतुक केले आहे. जितिन प्रसाद हे उत्तर प्रदेशमधील एक प्रभावी नेते आहेत. विशेषत: काँग्रेससाठी ते ब्राह्मण चेहरा असल्यामुळे आता उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचे व्होटबँकेचे गणित बिघडण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया

“गेल्या तीन पिढ्यांपासून माझी काँग्रेसशी जवळीक आहे. परंतु, हा निर्णय मी अतिशय विचारपूर्वक घेतला आहे. मी कोणता पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हे महत्त्वाचे नाही तर मी कोणत्या पक्षात प्रवेश करत आहे आणि का? हा प्रश्न महत्त्वाचा आहे.” अशी प्रतिक्रिया भाजप प्रवेशानंतर जितीन प्रसाद यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

पुढे ते म्हणाले की, “देशात खऱ्या अर्थाने संस्थात्मक राजकीय पत्र असेल तर तो भाजप आहे, हे मला गेल्या ८-१० वर्षांपासून जाणवत होते. इतर पक्ष एखाद्या व्यक्तीचे किंवा क्षेत्राचे झाले. मात्र राष्ट्रीय पक्षाच्या नावावर भारतात जर कुठला पक्ष असेल, तर तो भाजपच आहे.”

“आपल्या लोकांच्या हिताचे रक्षण करू शकत नाही किंवा त्यांच्यासाठी काम करू शकत नाही, अशा पक्षात राहण्यात काय अर्थ आहे. काँग्रेसमध्ये राहून काहीही करता येत नव्हते. काँग्रेस पक्षात मला मदत करणाऱ्या सर्व लोकांचे मी आभार मानतो. मात्र, मी भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करे. आपला देश आज अनेक आव्हानांचा सामना करत आहे. या आव्हानांसमोर देशहितासाठी जर कोणता पक्ष आणि कोणता नेता मजबुतीने उभा ठाकला असेल तर तो पक्ष भाजप आणि ती व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत.” असेही मत त्यांनी व्यक्त केले.

कोण आहेत जितिन प्रसाद?

जितिन प्रसाद हे माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जितेंद्र प्रसाद यांचे पुत्र आहेत. २०१९च्या लोकसभा निवडणुकांनंतर काँग्रेसमध्ये अध्यक्षपदापासून ते पक्षीय कार्यप्रणालीपर्यंत बदल करण्यात यावेत, अशी मागणी पक्षातील एका गटाने केली होती. जी-२३ असे या गटाला म्हटले गेले. या गटाने आपल्या शिफारशीवजा मागण्यांचे पत्रच सोनिया गांधी यांना सादर केले होते. या गटामध्ये जितिन प्रसाद यांचा समावेश होता.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button