राऊतांनी कंगनावर तुटून पडावं याचा अर्थ कुठेतरी पाणी मुरते – तरुण भारत

Sushant Singh Rajput - Kangana Ranaut - Sanjay Raut - CM Uddhav Thackeray

नागपूर : राज्यात सध्या एकीकड कोरोना (Corona) तर दुसरीकडे कंगना विरुद्ध शिवसेना (Shiv Sena) असा वाद पेटला आहे. कंगना रणौत (Kangana Ranaut) मुंबईत (Mumbai) आल्यानंतर शिवसेना विरुद्ध कंगना वादाला शाब्दिक युद्धाचं स्वरूप आलं आहे. सामानाच्या अग्रलेखातून शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) सतत कंगनावर टीका करताना दिसून येत आहे. आणि याच मुद्द्यावरून तरुण भारताने आजच्या अग्रलेखात संजय राऊत यांच्यासह शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे.

आजचा तरुण भारतातील अग्रलेख…

फक्त सुशांतसिंहच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूचा तपास आणि कंगना राणावत हिचे मुंबईत सुरक्षित दाखल होणे, एवढे दोन वगळता जगासमोरील उर्वरित सर्व प्रश्न निकाली निघाले असल्यागत काही राजकारणी लोक, माध्यमं आणि जनेतेचे बेताल वागणे चालले आहे. एरवी, इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांच्या आत्महत्या होतात इथे, पण सरकारी यंत्रणाच कशाला, काळं कुत्रं भीक घालत नाही त्यांच्या मरणाला. पण, पुढ्यात असलेल्या बिहार प्रांताच्या विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर सुशांतसिंहचे आत्महत्या प्रकरण मात्र जमेल तेवढे अन् शक्य होईल तितके दिवस धगधगते ठेवण्यात तिथल्या सरकारला रस आहे.

दरम्यान, हे केवळ मृत्यू, हत्या वा आत्महत्येचे साधेसे प्रकरण नसून, चित्रपटजगतातील बड्या धेंडांचे एक रॅकेट, त्याचे षडयंत्र आणि दाऊद इब्राहीमसारख्या (Dawood Ibrahim) गुंडांच्या धंद्याची गणितं त्यामागे असल्याचे हळूहळू उघड होऊ लागले आहे. विद्यमान राज्य सरकारमधील काही नेत्यांचे धागेदोरे या प्रकरणाशी जुळलेले असल्याचा संशय व्यक्त होऊ लागल्यानंतर, सुशांतसिंह मृत्यू प्रकरणाचे गूढ अधिकच गडद होत गेले. ते गूढ उकलणे राज्य सरकारसाठी जिकिरीचे ठरू लागल्याने, तपास सीबीआयकडे सुपूर्द करण्याच्या निर्णयाप्रत केंद्र सरकार आले. सुशांत प्रकरणात जिद्दीने काही लोक समोर आलेत. त्यांनी चित्रपटसृष्टीतील या रॅकेटचे रहस्य उघड केले. काही कलावंतांनी चालवलेली दादागिरी, घराणेशाही, कंपूशाही, नवोदितांना डावलण्याचे त्यांचे कटकारस्थान, त्यातून ‘आपले’ वगळता इतर कुणालाच, कुठेच, कसलाच थारा मिळणार नाही, याची तजवीज करण्यात गुंतलेली मंडळी इतरांना जगणे नकोसे करते, आकाशात भरारी घेण्याची त्यांची स्वप्नं कशी पायाखाली चिरडते, याचे वर्णन या काळात कानी पडले. प्रकरण ‘मी टू’चे असो वा मग सुशांतच्या मृत्यूचे, रुपेरी जगतातील एक वेगळेच, पण भयाण वास्तव यानिमित्ताने समोर आले. आणले गेले. अन्यायाचा हा पाढा जगापुढे वाचण्यात ज्यांचा वाटा महत्त्वपूर्ण राहिला त्यात कंगना राणावतचे नाव अधोरेखित करण्याजोगे आहे. बहुधा मागील काही दिवसांत कंगनाचा मुंबई पोलिसांविरुद्धचा थयथयाट आणि संजय राऊतांनी तिच्या विरोधात पातळी सोडून चालवलेली भाषणबाजी, याला कारणही तेच असावे.

एका गोटाला कुणाचेतरी बुरखे फाडायचेत, दुसर्‍याला त्याचा बचाव करायचाय्. या प्रयत्नांत, कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील सरकारी अपयशावर आपसूकच पडदा पडेल, या आशेत जगणारे काही आत्मे आपले राजकारण साधण्यासाठी सरसावले आहेत. शिवसेनेसारख्या, राष्ट्रीय राजकारणातील एका घटक पक्षाने कंगना राणावतचे म्हणणे एवढे मनावर का घ्यावे अन् तिला फैलावर घेण्यासाठी संजय राऊतांनी चवताळून का उठावे? कुणाच्या बचावार्थ चालले आहे हे असे कुणालातरी शिंगावर घेणे? अध्ययन सुमंत नामक व्यक्तीने कुठल्याशा मुलाखतीत, कंगना ड्रग्ज घेते, असा आरोप केला, तर पोलिस लागलीच स्वत:हून त्या प्रकरणाची चौकशी सुरू करतात? अन् सुशांतचा मृत्यू नैसर्गिक नसून संशयास्पद असल्याचा आरोप त्याचे आई-वडील पहिल्या दिवसापासून करत होते, तर त्याची दखल घेण्याची फुरसत झाली नव्हती महाराष्ट्र पोलिसांना? कुणाच्या तालावर नाचत होते इथले पोलिस प्रशासन? कोरोनाच्या संकटात फसलेले शहर वार्‍यावर सोडून, कंगनाचे खाजगी कार्यालय पाडण्यासाठी पुढाकार घेण्याइतकी सवड झाली मुंबई मनपाच्या अधिकार्‍यांना आता? संजय राऊतही इतके खाली उतरले की, कंगनाला धमकी देण्याची दुर्बुद्धी व्हावी त्यांना? मुंबईत पाय ठेवू न देण्याचा इशारा द्यावासा वाटला? कुणाची चाकरी करण्यासाठी पणाला लावत होते ते आपली इभ्रत?

एकूण, हे प्रकरण जगासमोर मांडले जातेय् त्या पद्धतीचे नाही, हेच खरे. तशीही बॉलीवूडची व्याप्ती जागतिक स्तरावरची आहे. तिथल्या छोट्याशा घडामोडींचा इको जगाला ऐकू जावा इतका तीव‘ असतो. सुशांत प्रकरणात सुरुवातीला रिया चक‘वर्तीच्या तक्रारीला काहीसा अधिकचा भाव देणे असो, त्याच्या पालकांच्या तक्रारीला केराची टोपली दाखवण्याचा प्रकार असो, चौकशीसाठी कुणाला बोलवायचे, कुणाला नाही, याचा निर्णय पोलिस मु‘यालयाऐवजी मंत्रालयातून होणे असो, मुंबई महापौर बंगल्यात याही काळात रंगलेल्या पार्ट्यांचे किस्से असोत… सरकारमधील कुणीतरी यात खोलवर गुंतलेले असल्याचेच सिद्ध करणारा सारा घटनाक‘म आहे. कंगनाविरुद्धचा थयथयाट हा तर स्वाभाविक परिणाम आहे. मुळात दुखणे, हा तपास सीबीआयकडे वर्ग करण्याचे आहे. एरवी, राऊतांनी कंगनावर तुटून पडावं असं त्यात काहीच नव्हतं. पण, तरीही ते तुटून पडलेत, याचा अर्थ कुठेतरी पाणी मुरलेले आहे आणि खुद्द संजय राऊत तेच त्यांच्या वर्तनातून सिद्ध करीत आहेत.

खरं सांगायचं तर शिवसेनेचे पाय दिवसागणिक खोलात चालले आहेत. कोविड असो की पुराची समस्या, या पक्षाच्या धुरीणांना कुठलीच परिस्थिती नीट हाताळता आलेली नाही. मुंबई-पुण्याच्या पलीकडेही महाराष्ट्राची सीमा विस्तारलेली आहे, याची जाणीव सरकार चालवणार्‍यांना आहे, असे कुठेही जाणवत नाही, इतका त्यांनी उर्वरित महाराष्ट्र वार्‍यावर सोडला आहे. सुशांत, कंगना प्रकरणात इतका जीव ओतण्याचे कारण या अपयशातही दडले आहे. बिहार सरकारला तिथल्या निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर हे प्रकरण तापत ठेवायचे आहे, तर महाराष्ट्र सरकारला, कुणाचातरी बचाव करण्यासाठी ते शक्य तितक्या लवकर निपटवायचे आहे. त्यासाठीच इतर सार्‍या प्रश्नांचे गांभीर्य वेशीवर टांगून राज्य सरकार कुणाच्यातरी दिमतीला उभे ठाकले आहे. संजय राऊतांचे बरळणे काय, गृहमंत्री अनिल देशमुखांच्या धमक्या काय, भाई जगतापांनी परवा विधिमंडळात अर्णव गोस्वामी आणि कंगनाविरुद्ध दाखल केलेला हक्कभंग काय, सरकारमधील सर्वच घटक पक्षांच्या नेतृत्वाची केविलवाणी धडपड झळकल्याशिवाय राहात नाही त्यातून. नाही म्हणायला, प्रसिद्धियोग साधण्यासाठीची कंगनाची उच्चरवातली बडबड अयोग्य ठरवता येईलही, पण देशमुख-राऊतांचे बोलणेतरी कुठे मापात तोलण्याजोगे होते? जुने झाकण्यासाठी नवे वाद उकरून काढण्याचीच धडपड होती इथे प्रत्येकाची. अर्णव अन् कंगनाचे वर्तन जर हक्कभंग दाखल करावा इतके चुकीचे होते, तर त्या निकषांवर राऊतांविरुद्धही हक्कभंग दाखल व्हायला हवा.

‘‘मुंबई पोलिसांबाबत जो अभिमान, आदर वाटायचा, तो आता वाटत नाही,’’ असं म्हणाली कंगना. मुळात आपल्या वागणुकीतून खुद्द पोलिस विभागाने तो विश्वास घालवला आहे, असे मत यावेळी कुणीतरी जाहीर रीत्या व्यक्त केलेय् एवढेच. बाकी, जनसामान्यांच्याही मनात भावना तीच आहे. व्यक्त होण्याची ताकद, इच्छा, कुवत आणि हिंमत गमावून बसली आहे सामान्य जनता, एवढीच काय ती सरकारची जमेची बाजू. अन्यथा, त्याचे अपयश आणि लाजेची लक्तरे तर परवा विधिमंडळाच्या अधिवेशनात पाऽऽर वेशीवर टांगली गेली आहेत. इतर सारी कामे सोडून राणावतचे कार्यालय पाडण्यासाठी मुंबई मनपाचे सज्ज होणे जनतेला उमगत नाही असे थोडीच आहे! या प्रकरणात शिवसेना नेमकी कुणाच्या बचावासाठी सरसावली आहे, हे न समजण्याइतकीही जनता खुळी नाही. कंगनाला, जनतेच्या पैशातून सुरक्षाव्यवस्था पुरवण्याची वेळ या असल्या मूर्खपणातून उद्भवली आहे. त्याबाबत खंत बाळगायचे सोडून, तिच्या मुख्य आरोपांना बगल देत, सुशांतवरील अन्यायाची ऐशीतैसी करीत, लोकाधिकार पायदळी तुडवत, अपयशाचे पोवाडे गाण्याची रीत आतातरी सोडली पाहिजे ना राऊतसाहेबांनी! कधीकाळी जनसेवेतून मुंबईकरांच्या मनावर गारुड घालणारी शिवसेना, यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीत मात्र सत्तेत हरवलेली दिसते आहे. तिची उद्धिष्टंही सत्तेच्या गर्तेत सापडलेली दिसताहेत. बहुधा सत्ता हातून गेल्यावर येईल सारेकाही ताळ्यावर. पण, तोवर तिच्या नावेची वल्हे राऊतांच्या हातात असणार आहेत, त्याचे काय? असा प्रश्नही तरुण भारताने उपस्थित केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER