सरकारी कामकाजात मराठीचा वापर टाळणाऱ्या कर्मचाऱ्यांना दणका; वेतनवाढ रोखणार – मुख्यमंत्री

CM Uddhav Thackeray

मुंबई :  सरकारी कामकाजात मराठीचा वापर टाळणाऱ्या कर्मचाऱ्यांचे थेट वेतन कपात करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधित विभागांना आदेशसुद्धा दिले आहेत. वारंवार सांगूनही अनेक कार्यालयांकडून मराठी भाषेचा वापर केला जात नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

यासंबंधी परिपत्रकही काढण्यात आले आहे. प्रशासकीय कामकाजात मराठी भाषेचा वापर कटाक्षाने व्हावा यासाठी अनेकदा सूचना केल्या असतानाही मराठीचा वापर टाळल्याचा प्रकार समोर आला आहे. “प्रशासकीय कामकाजात मराठी भाषेचा वापर करण्यासंबंधी वारंवार सूचना देण्यात आल्यात. मराठी भाषेच्या वापरामध्ये येणाऱ्या अडचणींसंदर्भात उपाययोजनादेखील सुचवल्यात. तरीसुद्धा शासकीय कार्यालयातून आणि प्रशासकीय विभागातून काटेकोरपणे १०० टक्के मराठी भाषेचा वापर केला जात नसल्याच्या बाबी निदर्शनास येत आहेत.

ही बातमी पण वाचा : आषाढी महापुजेचा मान मिळवणारे उद्धव हे ठाकरे घराण्यातले ठरले पहिले नेते

काही मंत्रालयीन विभागांचे शासन निर्णय इंग्रजी भाषेत असल्याचे दिसून येते. ” अशी माहिती परिपत्रकात देण्यात आली आहे. महानगरपालिकांकडून मराठी भाषेचा सक्षमपणे वापर होत नसल्याबाबत तसंच नैसर्गिक आपत्तींची माहिती देताना व त्यासंदर्भात नागरिकांना सूचना देताना मराठी भाषेचा वापर अधिकाऱ्यांमार्फत केला जात नसल्याच्या तक्रारी विभागाकडे ‘आपले सरकार’ प्रणालीमार्फत तसंच अन्य विविध माध्यमांतून वारंवार प्राप्त होत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

या सर्व तक्रारींच्या अनुषंगाने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शासकीय कामकाजात मराठी भाषेचा वापर करण्यासंदर्भात वारंवार देण्यात आलेल्या सूचना पुन्हा एकदा सर्व विभागांनी देण्याबाबत तसंच सूचनांचे पालन न करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांविरोधात शिस्तभंगविषयक कारवाई करण्याच्या सूचना देण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. लोकसत्ताने हे वृत्त दिले आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER