संघाचा इतिहास का शिकू नये?

Mohan-Bhagwat

badgeराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अलीकडे काही नवे अभ्यासक्रम तयार केले आहेत. त्या मध्ये बी.ए. पदवी दुसऱ्या वर्षाच्या भ्यासक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानावर एक धडा शिकवला जाणार आहे. देशातल्या कुठल्या विद्यापीठाने पहिल्यांदाच अशा प्रकारे संघाला अभ्यासात ठेवण्याचे धाडस केले आहे. देशात आणि राज्यात संघ विचारधारेच्या भाजपची सत्ता आहे. नागपूर विद्यापीठातील अभ्यास मंडळांवर संघ विचाराच्या ‘शिक्षण मंच’चे प्रभुत्व असल्याने त्यांना हे करता आले. इतिहास मग तो कुठलाही असो, शिकण्यात काही गैर नाही; पण संघाचा हा धडा वादग्रस्त ठरू पाहतो आहे. तथाकथित पुरोगाम्यांनी यावरून वाद पेटवला आहे. शिक्षणाचे भगवीकरण सुरू झाल्याची ओरड सुरू झाली आहे.

संघाची स्थापना ९५ वर्षांपूर्वी झाली. हिंदूंना संघटित करणे हा पवित्र हेतू त्यामागे होता. त्या हिशेबाने संघाने विधायक कामांमध्ये स्वतःला गुंतवून घेतले. त्यामुळे संघाचे काम देशभर झाले. मुसलमानांना व्होट बँक मानणाऱ्या काँग्रेसने संघाबद्दल नेहमीच गैरसमज पसरवण्याचे काम केले. स्वातंत्र्य लढ्यात संघाचे लोक नव्हते, असा प्रचार अजूनही केला जातो; पण ते खोटे आहे. पहिले सरसंघचालक डॉ. हेडगेवार हे संघ स्थापनेआधी काँग्रेसमध्ये होते. संघाचे अनेक लोक स्वातंत्र्यासाठी झटले आहेत; पण ते कधी पुढे आले नाहीत. महात्मा गांधींची हत्या संघाने केली, असे काँग्रेसवाले आजही सांगतात; पण गांधीजींचा मारेकरी नथुराम गोडसे हा संघाचा स्वयंसेवक नव्हता. फार आधी त्याने संघ सोडला होता. संघ ही जातीय संघटना आहे, मुसलमानांच्या विरोधात आहे असाही प्रचार होतो. ह्या पुस्तकाच्या रूपाने पहिल्यांदाच संघाचा अधिकृत आणि विश्वासार्ह इतिहास जनतेपुढे येतो आहे. त्यामुळे संघाबद्दलचे गैरसमज दूर होण्याला मदत होईल.

संघ दिसतो तसा नाही. संघाची अनेक रूपे आहेत. त्यातले भाजप हे एक रूप आहे; पण वनवासी कल्याण आश्रम, हेडगेवार रक्तपेढी, राष्ट्रसेविका समिती अशा वेगवेगळ्या चेहऱ्याने संघाचे विधायक कार्य देशभर सुरू असते. संघाला वाहून घेतलेले स्वयंसेवक कुठलाही गाजावाजा न करता काम करत असतात आणि त्यांची संख्या कोटींमध्ये आहे. राष्ट्रप्रेम आणि हिंदुत्व ह्या मजबूत पायावर उभ्या संघाचे काम देशातच नव्हे तर विदेशातही पोचले आहे. संघाची सकारात्मक बाजू एका विद्यापीठाच्या व्यासपीठातून तरुणांपुढे जाणार असल्याने देश सशक्त होण्याला मदतच होणार आहे.