ऐतिहासिक निर्णय! सैनिक स्कूलमध्ये मुलींना मिळणार प्रवेश

Girls will get admission in Sainik School - Maharastra Today

नवी दिल्ली :- देशातील सर्व सैनिकी शाळांमध्ये मुलींना प्रवेश देण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून सर्व सैनिकी शाळांमध्ये मुलींना प्रवेश दिला मिळेल. सैनिकी शाळा ‘सैनिक स्कूल सोसायटी’तर्फे चालवल्या जातात. सैनिक स्कूल सोसायटीवर संरक्षण मंत्रालयाचे नियंत्रण असते. सैनिकी शाळांमध्ये स्त्री – पुरुष समानतेच्या बाबतीत हा महत्त्वाचा निर्णय आहे, असे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले. सैन्यात भरती होण्यासाठी वातावरण तयार करणे हा त्याचा उद्देश होता. सध्या देशात २८ सैनिक स्कूल आहेत. (Defence state Minister Shripad Naik announced Girl students can take admission in all Sainik Schools in Nation)

श्रीपाद नाईक

मुलींना सैनिकी शाळांमध्ये प्रवेश देण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी केंद्र सरकारने घेतला आहे. सैनिक स्कूल छंगछी, मिझोरम येथे शैक्षणिक सत्र २०१८-१९ मध्ये मुलींना प्रवेश देण्यात आला होता. आता २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून सर्व शाळांमध्ये मुलींना प्रवेश देण्यात येणार आहे, अशी माहिती श्रीपाद नाईक यांनी दिली. पहिले सैनिक स्कूल महाराष्ट्रातील सातारा येथे स्थापन झाले होते, हे उल्लेखनीय.

१०० सैनिक स्कूल सुरू होणार

केंद्र सरकार देशभरात १०० सैनिक स्कूल स्थापन करण्याचा प्रस्ताव घेऊन येत आहे. सैनिक स्कूल सोसायटीवर याबाबत जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सैनिक स्कूल सोसायटीकडे संलग्नता प्रस्तावांना मंजुरी देण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. ज्या सैनिक स्कूल प्राथमिक व्यवस्था, गुणवत्ता आणि निकष पूर्ण करतील त्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यात येतील. सैनिक स्कूल सोसायटी ही संलग्नता प्रक्रियेतील महत्त्वाची संस्था असेल. त्यांच्याकडून सलंग्नता प्रस्ताव मंजूर केले जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मंजुरीचे प्रस्ताव अंतिम टप्प्यात

संलग्नता प्रस्तावांना मंजुरी देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. हे प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाकडे पाठवले जातील. याबाबत प्रक्रिया निर्धारित करण्यात येत आहे. संसदेत सरकारने बुधवारी सैनिक स्कूलबाबत महत्त्वाची घोषणा केली. सरकारी संघटना, खासगी संस्था आणि राज्य सरकारांच्या सहकार्याने देशभरात सैनिक स्कूलची स्थापना केली जाणार आहे.

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी खासदार कूपनाथ मल्लाह आणि इतर सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरात ही माहिती दिली. सैनिक स्कूल सरकारी संस्था, खासगी संस्था आणि गैरशासकीय संस्था यांच्याशी संलग्नित करून चालवल्या जातील. सीबीएसईच्या अभ्यासक्रमानुसार शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यायची आहे. सैनिक स्कूलच्या शिक्षणद्वारे राष्ट्रप्रेम वाढवण्याचे  शिक्षण दिले जाईल. नव्या सैनिकी शाळा सैनिक स्कूल सोसायटीसोबत जोडल्या जातील. याबाबत मार्गदर्शक सूचना बनवल्या जात आहेत, अशी माहिती नाईक यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER