‘अहिंसा परमो धर्म:’ वगैरे ते गेलं सर्व खड्ड्यात… मनसेने करून दिली प्रबोधनकार ठाकरेंच्या विचारांची आठवण

'स्त्री' सन्मान राखण्यासाठी काय केले पाहीजे. मनसेकडून प्रबोधनकारांच्या विचारांची आठवण सोशल मीडियावर

hinganghat-lecturer-dies-mns-tweet-prabodhankar-old-speech

मुंबई : महाराष्ट्राला सुन्न करणारी घटना विदर्भाच्या वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे घडली. गेले सात दिवस मृत्यूशी झुंज देत असलेल्या पीडितेने अखेर या जगाचा निरोप घेतला. या दुःखद घटनेचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले. मन सुन्न करून टाकणा-या या घटनेने पुन्हा स्त्री सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. कोपर्डी, अमरावती न संपणारी शहरांची नावे. न संपणारे महिलांवरील अत्याचार पुरोगामी म्हटल्या जाणा-या महाराष्ट्रात स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे.

याच पार्श्वभूमीवर मनसेने प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांच्या आठवणी सांगितल्या आहेत. स्त्रीची कोणी टिंगल करत असेल, तर तिचा सन्मान राखण्यासाठी कशी भूमिका घेतली पाहिजे, या संदर्भात प्रबोधनकार ठाकरे यांनी केलेल्या भाषणाचा जुना व्हिडीओ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ट्विट केला आहे. “महिलांबद्दल जितका आदर तुम्ही अंत:करणामध्ये साठवीत जाल, तितका तो शिवराया तुमच्यावर फार प्रसन्न होईल! महिलेशी कुणी गैरवर्तन केलं तर एक फाऽडकन भडकावली पाहिजे. ‘अहिंसा परमो धर्म:’ वगैरे ते गेलं सर्व खड्ड्यात…” ही प्रबोधनकार ठाकरे यांनी त्यावेळी भूमिका मांडली होती.

३० ऑक्टोबर १९६६ सालचं प्रबोधनकार ठाकरे यांच्या भाषणाच ऑडिओ रेकॉर्डिंग मनसेने ट्विट करून प्रबोधनकारांच्या विचारांचा अवलंब करणे आताच्या घडीला किती महत्त्वाचे आहे याची जाणीव करून दिल्याचे अधोरेखित होत आहे. त्याचप्रमाणे, राज्यात महिला अत्याचाराच्या बातम्या पाहून फक्त हळहळ व्यक्त करून चालणार नाही. जिथे नराधमांकडून अन्याय-अत्याचार दिसतील तिथे कशाचीही तमा न बाळगता प्रतिकारासाठी धावून गेलंच पाहिजे- असे मनसेने म्हटले आहे.

प्रत्येक पावलावर मला माझ्या पालकांची आठवण येते – उद्धव ठाकरे