हिंगणघाट जळीतकांड : उद्यापासून सुनावणी, उज्ज्वल निकम सरकारी वकील

Ujjwal Nikam

वर्धा : राज्यात गाजलेल्या हिंगणघाट जळीतकांड प्रकरणाच्या सुनावणीला सोमवारपासून न्यायालयात सुरुवात होणार आहे. या खटल्यासाठी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम सोमवारी हिंगणघाट न्यायालयात युक्तिवाद करतील. (Hinganghat case hearing will start from tomorrow)

३ फेब्रुवारी २०२० रोजी हिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातून आरोपी विकेश उर्फ विक्की नगराळे याने युवतीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले होते. सात दिवस मृत्युशी झुंज दिल्यानंतर या तरुणीचा रुग्णालयात मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तीन महिन्यांत हा खटला निकाली काढून आरोपीला शासन करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे न्यायालयीन प्रक्रिया खोळंबली होती. पोलिसांनी घटनेनंतर अवघ्या २५ दिवसांत म्हणजे २८ फेब्रुवारीला न्यायालयात ४२६ पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. खटला चालवण्यासाठी वर्ध्यात फास्ट ट्रॅक कोर्ट उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, हा अर्ज मंजूर न झाल्याने याप्रकरणाची सुनावणी हिंगणघाट येथे होणार आहे. आरोपी विक्की नगराळेवर आरोप ठेवण्याची प्रक्रिया उद्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे.

घटना

या घटनेत बळी पडलेली युवती हिंगणघाटच्या श्रीमती कुणावार महिला महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयाची अर्धवेळ प्राध्यापक होती. ३ फेब्रुवारीला सकाळी ती बसने हिंगणघाटला आली. आरोपी विकेश नगराळे तिच्या मार्गावर दबा धरून बसला होता. ती दिसताच त्याने दुचाकीतील पेट्रोल काढून तिच्यावर ओतले आणि पेटवून दिले. ती ४० टक्के होरपळली. नागपूमधील एका खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. आठवडाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर तिची प्राणज्योत मालवली.

आरोपी विक्की नगराळे याचे लग्न झाले असून त्याला सहा महिन्यांची मुलगी आहे. या घटनेपूर्वी तीन महिन्यांपूर्वी त्याने पीडितेला त्रास दिला होता. याआधी तिचा जुळलेला विवाह तुटल्याने पीडितेच्या वडिलांनी आरोपीला खडसावले होते.

आरोपी विकेश उर्फ विक्की नगराळे सध्या नागपूर कारागृहात आहे. कारागृहात विक्कीवर इतर कैद्याकडून हल्ला होण्याची शक्यता होती. त्यामुळे बॅरेकमधील काही कैद्यांना दुसरीकडे स्थलांतरित केले आहे. विक्कीला तुरुंगात आणले तेव्हा बॅरेकमध्ये १५ कैदी होते. मात्र, त्यानंतर या बॅरेकमध्ये केवळ फक्त पाच कैदी ठेवण्यात आले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER