हिंदुत्व सहिष्णू असल्याने भारतात सर्व धर्मांचे लोक सुख आणि समाधानाने राहतात : फडणवीस

Devendra Fadnavis

नागपूर :- ‘केवळ एका समाजाकडे राजकीय शक्ती एकवटली जावी आणि मुस्लिमांना राजकारणात सहभागी होण्याचा कोणताही अधिकार असू नये या खोट्या मुद्द्यावर संघाचे हिंदुत्व आधारलेले आहे. खोट्या हिंदुत्ववादी संघाच्या विरोधात आव्हान उभारण्याचं काम संसद आणि विधानसभांमध्ये मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींच्या जास्तीत जास्त उपस्थितीतून होईल. ’या आशयाचं ट्विट असदुद्दीन ओवेसी यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

हिंदुत्व सहिष्णू आहे म्हणूनच एमआयएम पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी भारतात काहीही बोलू शकतात. त्यांच्यावर हल्ला होत नाही. यामधूनच हिंदुत्वाची सहिष्णुता दिसून येते, असे प्रत्युत्तर फडणवीस यांनी दिले. देवेंद्र फडणवीस सध्या नागपुरात पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचा प्रचार करत आहेत. यावेळी एका सभेत त्यांनी हे वक्तव्य केले.

यावेळी ते म्हणाले की, हिंदुत्व हे कधीच कट्टर असू शकत नाही. हिंदुत्व हे सहिष्णू आहे. हिंदुत्वाने कधीच कुणावर आक्रमण केले नाही. त्यामुळेच भारतात सर्व धर्मांचे लोक सुख आणि समाधानाने नांदत आहेत. तसेच हिंदू बहुसंख्य असणाऱ्या देशात असदुद्दीन ओवेसी काहीही बोलू शकतात. तरीही ओवेसींवर हल्ला होत नाही. यामध्येच हिंदुत्वाची सहिष्णुता दिसून येते. हैदराबादच्या निवडणुकीसाठी ओवेसी सध्या काहीबाही बोलत आहेत. मात्र, त्यांना याचा फायदा होणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

मुंबईतील प्रतिष्ठित ‘कराची स्वीट्स’च्या नावावरून शिवसेना विरुद्ध मनसे असा सामना रंगला आहे. यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ‘अखंड भारतावर आमचा विश्वास आहे, एक दिवस कराची भारताचा भाग असेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, देशात ‘लव्ह जिहाद’च्या घटना घडत आहेत. त्यामुळे त्यांना रोखण्यासाठी कायदा आणणे आवश्यक आहे. ते कॉंग्रेस (Congress) नेते आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांच्या आरोपासंदर्भात एका प्रश्नाला उत्तर देत होते. गेहलोत यांनी भाजपवर ‘लव्ह जिहाद’ हा शब्द तयार करण्याचा आणि जातीय सलोखा बिघडविण्याचा आरोप केला होता. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, हे सर्व ढोंगी धर्मनिरपेक्ष लोक आहेत. हिंदूंवर हल्ले करणे आणि त्यांना शिव्या देणे म्हणजे धर्मनिरपेक्षता, असे त्यांचे मत आहे. देशात लव्ह जिहाद चालू आहे आणि केरळमध्येही भाजपाची सत्ता नसतानाही हे स्वीकारले गेले आहे. जेव्हा अशा गोष्टी उद्भवतात तेव्हा कायदे करणे ही सरकारची जबाबदारी बनते. काही भाजपाशासित राज्यांनी तथाकथित लव्ह जिहाद रोखण्यासाठी योजना आखल्या आहेत,अशी माहितीही त्यांनी दिली.

बिहार विधानसभा निवडणुकीत प्रभारी म्हणून यश मिळवल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस पदवाधीर मतदारसंघाच्या मिशनवर आहेत. नागपूर पदवीधर मतदारसंघात सहा ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्या सभा होणार आहेत. नागपूर पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस या ठिकाणी संपूर्ण ताकद पणाला लावताना दिसत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER