शिवसेना नेत्याच्या खासगी संस्थेला रेमडेसिवीर दिले; हिना गावित यांचा आरोप

Hina Gavit - Maharastra Today
Hina Gavit - Maharastra Today

नंदूरबार : राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाला असताना भाजपच्या खासदार हिना गावित यांनी मोठा आरोप केला आहे. नंदूरबार जिल्ह्यातील आदिवासी कोरोना रुग्णांवर उपचारांसाठी सीएसआर फंडातून सरकारला एक हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्स मोफत उपलब्ध करून देण्यात आली होती. परंतु, नंदूरबारचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या खासगी संस्थेला हे सर्व इंजेक्शन्स विक्रीसाठी दिले, असा गंभीर आरोप खासदार हिना गावित यांनी केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

खासदार हिना गावित यांनी ऑनलाईन पत्रकार परिषद घेऊन हा धक्कादायक आरोप केला. काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या नंदूरबारच्या नगराध्यक्ष रत्ना चंद्रकांत रघुवंशी यांनी ६ एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून रोटरी वेलनेस सेंटर या खासगी संस्थेसाठी एक हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्सची मागणी केली होती. रोटरी वेलनेस सेंटर ही संस्था शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्याशी संबंधित आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी पत्र मिळताच तत्काळ रोटरी वेलनेस सेंटर अँड मेडिसीन यांना शासकीय दरात एक हजार रेमडेसिवीर उपलब्ध करून द्यावेत, असा लेखी आदेश नंदूरबारच्या जिल्हा शल्यचिकित्सकांना दिला. विशेष म्हणजे अशी इंजेक्शन्स मिळण्यासाठी रोटरी वेलनेसकडून नंदूरबारच्या जिल्हा रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकाऱ्यांना ५ लाख ९४ हजार ५०० रुपयांचा धनादेश ६ एप्रिल रोजीच मिळाल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात नमूद केले आहे, असं गावित म्हणाल्या.

सीएसआर फंडातून नंदूरबारच्या गरीब रुग्णांना उपचारासाठी मोफत मिळालेल्या चार हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्सपैकी एक हजार इंजेक्शन जिल्ह्याधिकाऱ्यांनी एका खासगी संस्थेला विक्रीसाठी देणे नियमबाह्य आहे. या इंजेक्शन्सची विक्री करता येणार नाही, असे स्पष्ट असताना जिल्हाधिकाऱ्यांनी ५ लाख ९४ हजारांचा धनादेश स्वीकारून संस्थेला विक्रीसाठी दिली, हेसुद्धा चुकीचे आहे. शिवसेनेच्या नेत्याशी संबंधित खासगी संस्थेला लाभ पोहचविण्यासाठी काँग्रेसच्या नगराध्यक्षांच्या विनंतीवरून जिल्हाधिकाऱ्यांनी हे कृत्य केले आहे. नगराध्यक्षांचे विनंती पत्र आले, त्याच दिवशी संबंधित संस्थेकडून जिल्हा रुग्णालयाकडे धनादेश जमा झाला आणि त्याच दिवशी जिल्हाधिकाऱ्यांनी खासगी संस्थेला रेमडेसिवीर देण्याचा आदेश दिला ही तत्परताही संशयास्पद आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

नंदूरबार जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनेक रुग्णांची नोंद होत नाही. ज्यांची नोंद होते अशा रुग्णांनी रुग्णालये भरलेली आहेत. रेमडेसिवीरचा तुटवडा आहे. अशा स्थितीत जिल्हाधिकाऱ्यांनी खासगी संस्थेला एक हजार रेमडेसिवीर देणे शंका उपस्थित करते, असंही गावित म्हणाल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button