हिमंता बिस्वा सरमा होणार आसामचे मुख्यमंत्री; उद्या घेणार शपथ

Himanta Biswa Sarma

गुवाहटी : अखेर आसामच्या मुख्यमंत्रिपदासाठी (Assam CM) हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. भाजपच्या विधानसभेच्या गटनेत्यांच्या आजच्या बैठकीत हिमंता बिस्वा सरमा यांची विधानमंडळ गटनेते म्हणून निवड झाली. तसेच, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर म्हणाले की, सोमवारी हिमंता बिस्वा सरमा हे मुख्यमंत्र्याची शपथ घेतील.आज दिसपूर येथे भाजपच्या विधिमंडळ दलाची बैठक पार पडली. या बैठकीला बी. एल. संतोष, बैजयंत जय पांडा आणि अजय जम्वाल आदी नेतेही उपस्थित होते.

या बैठकीत मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी हिमंता बिस्वा सरमा यांच्या मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव ठेवला. हा प्रस्ताव बैठकीत मंजूर करण्यात आला. त्यामुळे सरमा यांच्या मुख्यमंत्रिपदावर शिक्कामोर्तब झाले आहे. दरम्यान, आसाममध्ये भाजपने पुन्हा सत्ता राखली आहे. भाजपने विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून विद्यमान मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल आणि हिमंता बिस्वा सरमा या दोन्ही नेत्यांपैकी कोणाचेही नाव जाहीर केले नव्हते. अखेर नव्या मुख्यमंत्र्यांची निवड करण्यासाठी सर्बानंद सोनोवाल आणि हिमंता बिस्वा सरमा यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शनिवारी दिल्लीत बोलावले. यावेळी आसामचे नवीन मुख्यमंत्री म्हणून हिमंता बिस्वा सरमा यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समोर आले.

कोण आहेत हिंमत बिस्वा सरमा?

२०१६ मध्ये हिंमत बिस्वा सरमा यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. २०१६च्या निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर भाजपने सर्बानंद सोनोवाल यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची सूत्रे दिली होती. सरमा यांनी केवळ आसामच्या पूर्वेकडील भागातच नव्हे तर संपूर्ण आसाममध्ये भाजपाला विजय मिळवून दिला आहे. यामुळे मुख्यमंत्रिपदासाठी सरमा यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली. हिमंता बिस्वा सरमा यांची राजकीय कारकीर्द खऱ्या अर्थाने १५ मे २००१ पासून सुरू झाली. त्यांनी गुवाहाटी हायकोर्टात प्रॅक्टिस केली आहे.

१ फेब्रुवारी १९६९ रोजी  त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील कैलाशनाथ सरमा हे साहित्यिक होते. त्यांची आई आसाम साहित्य संस्थांशी संबंधित आहे. सरमा यांनी कामरूपमध्ये अकादमी स्कूलमध्ये शिक्षण घेतले. तर गुवाहाटीतून महाविद्यालयीन शिक्षण घेतले. विज्ञान विषयात त्यांनी पदवी आणि नंतर पदव्युत्तर शिक्षण घेतले. राजकारणात असतानाच त्यांनी पीएच.डी. केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button