पेट्रोल-डिझेल महागाईमुळे फ्रांस पेटले, आणिबाणीची शक्यता

france

पॅरिस : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल व डिझेलवरील करवाढीच्या निषेधार्थ फ्रांसमधील जनता हिंसक आंदोलन करत असून सर्वत्र भयानक अशांतता आहे. तोडफोडीच्या घटनाही मोठ्या प्रमाणात घडत असून दंगली उसळू नये म्हणून सरकार आणिबाणी लावण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत 415 जणांना अटक करण्यात आली असून आतापर्यंतच्या हिंसाचारात सुरक्षा दलाच्या 23 जवानांसह 133 जण जखमी झालेले आहेत. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसांपासून निदर्शक रस्त्यावर उतरून वाहने तसेच इमारतीची जाळपोळ करत आहेत. दुकाने लुटण्याच्या प्रकरणामुळे परिस्थिती आणखी चिघळली असून या आंदोनामुळे फ्रांस 1968 नंतरच्या भीषण अशांततेला सामोरे जात आहे.

आधीच पेट्रोल महाग असताना त्यावरील कर वाढविण्यात आला आहे. त्याच्या निषेधार्थ पिवळा अंगरखा घालून लोक रस्त्यावर उतरले आहेत. पोलिस आणि निदर्शकांत चकमकी झाल्या आहेत. निदर्शकांनी दक्षिण फ्रांसमधील नरबानजिकचा एक टोलनाका पेटवून दिला. तसेच पूर्व फ्रांसमधील लिऑननजिक उत्तर दक्षिण मार्गावर रास्तारोको केला. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला.

दरम्यान कुठल्याही स्थितीत हिंसाचार खपवून घेणार नसल्याचे फ्रांसचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी म्हटले आहे. अधिका-यांवर हल्ले करणे, वारसास्थळांचा अनादर करणे हे सहन केले जाणार नसल्याचे ते म्हणाले.