उच्चशिक्षित व व्यावसायिक असलेल्या मंगळसूत्र चोरट्याला चिपळुणात अटक; दागिने जप्त

thief arrested in Chiplun

रत्नागिरी/प्रतिनिधी : मोटारसायकलवरून भरधाव वेगाने येऊन महिलांच्या गळ्यातले दागिने खेचून चोरी करणाऱ्याला आज चिपळूण पोलिसांनी अटक केली. आश्चर्य म्हणजे हा चोर शहरालगतच्या शिरळ येथील रहिवासी असून तो उच्च शिक्षित व काही काळ मेडिकल व्यवसाय करीत होता अशी माहिती पुढे आली आहे. त्याच्याकडून चोरीला गेलेले ३ लाख २६ हजार २१० रुपये किमतीचे १८ तोळे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या दागिन्यांची त्याने मुंबईत विक्री केली होती.

निदा अन्वर मणियार (३६, रा. गॅलेक्सी अपार्टमेंट, शिरळ-चिपळूण, मूळ पत्ता सारा पार्क, पेठमाप चिपळूण) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. गेल्या दोन महिन्यात चेन स्नॅचिंगच्या सलग पाच घटना घडल्या होत्या. त्यानुसार अज्ञातविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याविषयी पोलीस अधिक्षक डॉ.प्रविण मुंडे , अप्पर पोलीस अधिक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनांचा तपास सुरू होता. चोरी झालेल्या घटनास्थळी तसेच विविध ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली असता संशयित चोरीसाठी अ‍ॅप्रिलिया मोपेड मोटारसायकल वापरत असल्याचे दिसून आले. चोरीसाठी वापरलेली अ‍ॅप्रिलिया मोटारसायकल ही ठराविक लोकांकडेच असल्याने शोरूमद्वारे अशा २२ व्यक्तींची यादी काढून चौकशी केली असता त्याद्वारे चोरट्यापर्यंत पोहोचण्यास मदत झाली. निदा मनियार याने आपल्या ताब्यातील मोटारसायकल आरटीओ पासिंग केलेली नव्हती.

साक्षीदारांच्या माहितीनुसार तो चोरटा असल्याचा संशय होता. त्याचे स्केचिंगही तयार करण्यात आले होते. त्यांच्या प्रत्येक हालचालींवर पाळत ठेवून गोपनिय माहिती घेण्यात आली. तसेच मोबाईल नंबर वरून सीडीआर घेऊन चौकशी केली असता तोच चोरटा असल्याची खात्री झाली. त्यानुसार त्याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यांची पोलीस कोठडीत रवानगी करत कसून चौकशी केली असता त्याने या चोऱ्यांची कबुली दिली. त्यानुसार त्यांचकडून १८६.३ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, गंठन असे दागिने हस्तगत करण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले. यावेळी पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ अन्य पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

रत्नागिरी: बसचालक-वाहकाला मारहाणप्रकरणी आठ जणांना अटक