टिकटॉकविरोधातील याचिकेवर तातडीने सुनावणीस नकार

TikTok

मुंबई : तरुणाईला वेड लावणार्‍या टिकटॉक अ‍ॅपवर बंदी आणण्याची विनंती करणार्‍या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. नियमित तारखेनुसारच याचिका सुनावणीला घेतली जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

‘टिकटॉक’ अँपवर बंदीसाठी गृहिणीची उच्च न्यायालयात याचिका

युवा वर्गाला वेड लावणार्‍या टिकटॉक या मोबाईल अ‍ॅपविरोधात हिना दरवेश या मुंबईतील गृहिणीने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. सदर याचिकेद्वारे टिकटॉकवर बंदी आणण्याची विनंती करण्यात आली. उमलत्या पिढीवर होणारे वाईट संस्कार, अश्लील व्हिडीओ, युवा वर्गातील आत्महत्यांचे वाढते प्रमाण, निंदाजनक जातिवाचक उल्लेख याकडे सदर याचिकेत तीन मुलांची माता असलेल्या हिना यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले.

टिकटॉक हे चीनचे मोबाईल अ‍ॅप असून, त्यामागे भारताविरोधात छुपा हेतू असण्याची शक्यताही दरवेश यांनी व्यक्त केली. टिकटॉकवरील व्हिडीओजमुळे भारताची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर मलिन होत असून, त्याचा परिणाम देशाच्या विकासावरही होत असल्याचा दावा या याचिकेत दरवेश यांनी केला आहे. दरम्यान, मद्रास उच्च न्यायालयातही टिकटॉकविरोधात एक याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, सुनावणीनंतर दिलासा देण्यास न्यायालयाने नकार दिला होता.