जीएसटी करवसुलीचा उच्चांक : तुलनेत 12 टक्के जादा वसुली

GST collection

नवी दिल्ली :- जीएसटी (GST) करप्रणालीची सुरुवात झाल्यापासूनचा आतापर्यंतचा करवसुलीचा उच्चांक डिसेंबर २०२० मध्ये झाला. डिसेंबर २०१९ मध्ये झालेल्या करवसुलीच्या तुलनेत डिसेंबर २०२० मधील करवसुलीचे आकडे १२ टक्क्यांनी जास्त आहेत. एक महिन्यात १ लाख १५ हजार १७४ कोटी रुपये इतकी जीएसटी करवसुली झाल्याची माहिती अर्थ मंत्रालयाने दिली.

कोरोना (Corona) संकटाचा मोठा फटका जीएसटी करवसुलीला बसला होता. मात्र, ऑक्टोबर महिन्यापासून करवसुलीचा आकडा एक लाख कोटी रुपयांच्या पुढे गेला होता. त्यानंतर सलग तिसऱ्या महिन्यात करवसुली एक लाख कोटी रुपयांच्या वर नोंदवली गेली आहे. एप्रिल २०१९ मध्ये सर्वाधिक १ लाख १३ हजार ८६६ कोटी रुपयांची करवसुली झाली होती. हा उच्चांक मागे टाकत डिसेंबर २०२० मध्ये १ लाख १५ हजार १७४ कोटी रुपयांची करवसुली झाली.

डिसेंबरमध्ये जी जीएसटी करवसुली झाली, त्यात सेंट्रल जीएसटीची हिस्सेदारी २१ हजार ३६५ कोटी रुपयांची होती. याशिवाय आय-जीएसटीची हिस्सेदारी ५७ हजार ४२६ कोटी, तर राज्य जीएसटीची हिस्सेदारी २७ हजार ८०४ कोटी रुपये इतकी होती. आय जीएसटीमध्ये आयात करातून मिळालेल्या २७ हजार ५० कोटी रुपयांचा समावेश आहे. वरील करांशिवाय उपकरांतून सरकारला ८ हजार ५७९ कोटी रुपये प्राप्त झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER