`हायकोर्टांचे ‘कट पेस्ट’ निकाल पाहिले की डोक्यात तिडिक उठते’

odisha high court & Dhananjay Chandrachud
  • न्या. धनंजय चंद्रचूड यांची उद्वेगजनक खंत

नवी दिल्ली : उच्च न्यायालये अनेका वेळा दिलेल्या  निकालाचे तर्कसंगत समर्थन करणारे विश्लेषण न करता ‘कट पेस्ट’(Cut-paste) पद्धतीने निकाल देतात, असे निरीक्षण नोंदवून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी शुक्रवारी त्याबद्दल खंत व्यक्त केली.

न्या. चंद्रचूड म्हणाले की, हल्लीच्या संगणक युगात न्यायालयांकडून दिले जाणारे ‘कट पेस्ट’  निकाल ही एक गंभीर समस्या झाली आहे. निव्वळ ‘कट पेस्ट’ करून दिलेले उच्च न्यायालयांचे निकाल पाहिले की माझ्या तर डोक्यात तिडिक उठते. तुम्ही एखादी गोष्ट योग्य ठरवत असाल तर त्याची कारणमीमांसाही नीटपणे  द्यायला हवी, हेही या निकालांमध्ये पाळले जात नाही.

ओडिशा उच्च न्यायालयाच्या निकालाविरुद्ध केले गेलेल्या एका अपिलावर न्या. चंद्रचूड व न्या. एम. आर. शहा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली तेव्हा न्या. चंद्रचूड यांनी वरील निरीक्षण नोंदविले. भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) प्रवेश नाकारण्यात आलेल्या एका उमेदवाराचे हे प्रकरण होते. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या निर्णयाविरुद्ध त्याने आदी केंद्रीय प्रसासकीय न्यायाधिकरणात (CAT) दाद मागितली होती. न्यायाधिकरणाने ते फेटाळले. नंतर उच्च न्यायालयानेही त्याविरुद्धची याचिका फेटाळली म्हणून हा उमेदवार सर्वोच्च न्यायालयात आला होता.

उच्च न्यायालयाचे निकालपत्र पाहता त्यात न्यायाधिकरणाच्या निकालातील अनेक परिच्छेद जसेच्या तसे उतरवून काढलेले आढळले. त्यासंदर्भात न्या. चंद्रचूड यांनी वरील भाष्य केले. ते म्हणाले की, न्यायाधिकरणाच्या निकालपत्रातील परिच्छेद ‘कट पेस्ट’ पद्धतीने वापरून उच्च न्यायालयाच्या निकालपत्राची पाने वाढू शकतात. पण त्याने न्यायालयापुढे असलेल्या विवाद्य मुद्द्यांचे समाधानकारक निराकरण होत नाही. उच्च न्यायालयाने न्यायाधिकरणाचा निकाल योग्य ठरविला असला तरी तसे का केले याचे न्यायालयाने स्वतंत्रपणे विचार करून केलेले विश्लेषण निकालपत्रात दिसायला हवे. या पार्श्वभूमीवर खंडपीठाने हे प्रकरण नव्याने निर्णय घेण्यासाठी उच्च न्यायालयाकडे परत पाठविले.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER