
- तसे केल्यास देशाची धमर्निरपेक्षता धोक्यात येईल
मदुराई : भगवान मुरुगा हा ‘तमिळ परमेश्वर’ असल्याचे राजपत्र काढून जाहीर करण्याचा आदेश तमिळनाडू सरकारला द्यावा, अशी मागणी करणारी एक याचिका मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने फेटाळली. न्या. एम. एम. सुंदरेश व न्या. एस. अनंती यांच्या खंडपीठाने याचिका फेटाळताना म्हटले की, भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत या देशाचे धर्म निरपेक्ष स्वरूप अधोरेखित करण्यात आले आहे. याचिकाकर्त्याची मागणी मान्य केली तर त्याने या महान देशाच्या धमर्निरपेक्ष व संघराज्यीय स्वरूपास धक्का पोहोचू शकेल. भगवान मुरुगा यांना तमिळ भाषेचे परमेश्वर मानण्यास याचिकाकर्त्याकडे समर्थनीय कारण असूही शकेल. स्वत:च्या श्रद्धेनुसार ते आपल्यापुरते तसे मानू शकतात. पण सरकारने तसे मानणे शक्य नाही.
शिवाय एकट्या भगवान मुरुगा यांना तमिळ भाषेचे परमेश्वर मानणे योग्यही होणार नाही, असे मत नोंदवत खंडपीठाने पुढे म्हटले की, अनेक थोर साहित्यिकांच्या लिखाणाने तमिळ भाषा समृद्ध झाली आहे. ईसस्तुतीच्या साहित्यकृती हे या भाषेचे बहुमोल अलंकार आहेत. कोणत्याही एका देवाला तमिळ भाषेचे प्रतिनिधी मानणे म्हणजे भगवान मुरुगा सोडून अन्य देवांच्या स्तुतीप्रीत्यर्थ लिहिलेल्या तमिळ साहित्यास कमी लेखणे ठरेल.
‘तमिळनाडू’ नव्हे ‘तमिहल नाडू’
याच खंडपीठापुढे या राज्याचे नाव सर्व भाषांमध्ये ‘तमिळनाडू’ऐवजी ‘तमिहल नाडू’ असे लिहिले जावे, अशी मागणी करणारी आणखी एक याचिकाही आली होती. ती सरळसरळ न फेटाळता याचिकाकर्त्याच्या मागणीवर राज्य सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करावा, असा आदेश दिला गेला. याचिकाकर्त्याचे म्हणणे असे होते की, तमिळ भाषेत तमिळनाडू’चा उच्चार ‘तमिहलनाडू’ असा होतो. यातील ‘ह्ल’या तमिळ मुळाक्षराचा इंग्राजांना उच्चार करता येत नसे म्हणून त्यांनी ‘तमिळनाडू’ असे नाव लिहिण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्मिळ सोडून अन्य सर्व भाषांमध्येही ‘तमिळनाडू’ असेच लिहिले जाते. परंतु एखाद्या भाषेतील मुळाक्षराचा इतरांना नीट उच्चार करता येत नाही हे एखाद्या प्राचीन प्रदेशाचे नाव चुकीच्या पद्धतीने लिहिण्याचे समर्थन ठरू शकत नाही.
अजित गोगटे
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला