
- जन्म-मरणाच्या फेर्यातून मुक्ती हेच परमोच्च ध्येय
मदुराई : बलात्काराने गरोदर राहिलेल्या एका १५ वर्षाच्या मुलीच्या उदरात वाढत असलेला गर्भ गर्भपाताने काढून टाकण्याचा आदेश देताना मद्रास उच्च न्यायालयाच्या (Madras High Court) मदुराई खंडपीठाने त्या गर्भाला एक प्रकारे ‘आध्यात्मिक’ मोक्ष दिला.
या मुलीच्या गर्भपाताचा आदेश देताना न्या. बी. एस. स्वामीनाथन यांनी केवळ कायदेशीर तरतुदींचा नव्हे तर आध्यात्मित तत्वज्ञानाचाही आधार घेतला. आपण सर्वजण जन्माचा आनंद साजरा करत असलो तरी जन्म-मरणाच्या फेर्यातून कायमची मुक्ती मिळणे हेच परमोच्च आध्यात्मिक ध्येय असते, असे त्यांनी नमूद केले.
न्या. स्वामीनाथन यांनी त्यांच्या निकालपत्रात थोर तमिळ संत-कवी थिरुवल्लूर यांच्या ‘थिरुकुरल’ या महाकाव्यातील आणि आदि शंकराचार्यांच्या ‘भज गोविंदम’ या काव्यातील अनुक्रमे पुढील वचने उद््धृत केली:
‘माणसाने तर खरी कशाची आकांक्षा धरायला हवी तर ती जन्म-मृत्यूच्या फेºयातून कायमची मुक्ती मिळविण्याचीच असायला हवी.’ (थिरुवल्लूर)
‘पुनरपि जननम, पुनरपि मरणम,
पुनरपि जननी जठरम शयनम
इह संसारे खलू दुस्थारे
कृपया पोरे पाही मुरारे’ (आदि शंकराचार्य)
या बलात्कारित मुलीचे वडील काही वर्षांपूर्वीच वारले आहेत व तिची आई मनोरुग्ण आहे. तिचे मामा-मामी खूप गरीब असल्याने त्यांनी तिला एका सामाजिक संस्थेच्या हवाली केले आहे. स्वत: मुलीला चरितार्थाचे काही साधन नाही. ज्याने तिच्यावर बलात्कार केला त्याच्याविरुद्ध आधीपासूनच अनेक गंभीर गुन्हे नोंदविलेले आहेत. या वस्तुस्थितीची नोंद घेत न्यायालयाने म्हटले की, जन्माला न आलेला पोटातील गर्भ हीदेखिल एक स्वतंत्र व्यक्ती आहे. त्यामुळे गर्भपाताचा निर्णय घेताना तिच्या कल्याणाचाही विचार करायला हवा. प्राप्त परिस्थितीत जन्माला येणे आवडेल का, असे या गर्भाला विचारले तर तो नक्कीच ‘नाही’ असे उत्तर देईल.
या मुलीच्या गर्भपातासाठी तिच्या मामीनेच याचिका केलेली असल्याने ती या मुलीला आता वाºयावर सोडू शकत नाही. निदान ती सज्ञान होईपर्यंत तरी मामा-मामीनेच तिचा सांभाळ करावा. परंतु गरिबीमुळे त्यांना ते शक्य नसल्याने सरकारने या बलात्कारित मुलीला अंतमिर भरपाई म्हणून पुढील तीन वर्षे दरमहा पाच हजार रुपये द्यावेत, असा आदेशही न्यायालयाने दिला.
-अजित गोगटे
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला