न्यायालयाकडून वरवरा राव यांना जामीन मंजूर

मुंबई : उच्च न्यायालयाने नक्षलवादी चळवळीसंबंधित आरोप असणारे प्रसिद्ध तेलुगू कवी वरवरा राव यांना दिलासा दिला. वरवरा राव यांना न्यायालयाने सहा महिन्यांसाठी ५० हजारांच्या जातमुचलक्यावर सशर्त अंतरिम जामीन मंजूर केला आहे. जामीन मंजूर झाला तरी त्यांना न्यायालयाने हैदराबादमधील घरी जाण्यास परवानगी दिलेली नाही. वरवरा राव यांना बंधने घालण्यात आले आहेत. त्यांनी ‘एनआयए’ न्यायालयाच्या हद्दीबाहेर जाऊ नये, न्यायालयाच्या प्रत्येक तारखांवर हजर राहावे, इतर आरोपींच्या संपर्कात राहू नये. त्यांनी साक्षीदारांवर कोणताही दबाव किंवा पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करू नये, असे न्यायालयाने निकालात सांगितले.

सध्या वरवरा राव हे ८१ वर्षांचे आहेत. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती सातत्याने खालावत आहे. वरवरा राव यांना कुटुंबीयांकडून जामीन देण्याची मागणी केली जात होती. परंतु, ही विनंती न्यायालयाने वारंवार फेटाळली. तुरुंगात यांच्यावर उपचार होऊ शकत नसल्याने न्यायालयाने नोव्हेंबरमध्ये रुग्णालयात हलविण्यास परवानगी दिली होती. नंतर यांना मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यांची प्रकृती पाहता जामीन मिळावा, अशी मागणी कुटुंबीयांकडून केली जात होती. वरवरा राव यांच्या पत्नी हेमलता यांनी स्वतंत्र याचिका केली होती. प्रदीर्घ सुनावणीनंतर न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पिटाळे यांच्या खंडपीठाने याचिकेवर आपला निर्णय राखून ठेवला.

एनआयएची मागणी फेटाळली

वरवरा राव यांच्या जामिनाला स्थगिती देण्याची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली. सध्या वरवरा राव आजारपणामुळे अंथरुणाला खिळले आहेत. राव यांनी गेल्या ३६५ दिवसांपैकी १४९ दिवस विविध रुग्णालयात घालवले आहेत. यावरूनच त्यांच्या आरोग्यस्थिती लक्षात येते. राव यांची प्रकृती कारागृहात नाही, तर कुटुंबात राहून सुधारेल, असा दावा करत तळोजा कारागृहाऐवजी हैदराबाद येथे कुटुंबियांसोबत राहण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी राव यांच्या कुटुंबीयांने केली.

एल्गार परिषदेमार्फत नक्षलवाद्यांशी संबंध असून कोरेगाव भीमा हिंसाचार घडवून आणल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. नक्षलवाद्यांविरोधात २८ ऑगस्टला पुणे पोलिसांनी देशातील कित्येक भागांमधून वरवरा राव, गौतम नवलखा यांना अटक केली. भीमा कोरेगाव दंगल आणि आयोजित एल्गार परिषदेशी यांचा संबंध असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER