हायकोर्टाने जामीन मंजूर करूनही आरोपीला आठ महिने सोडले नाही उत्तर प्रदेशातील प्रकाराने हायकोर्ट संतापले

Allahabad High Court

लखनऊ : अलाहाबाद उच्च न्यायालयाने (Allahabad High Court) जामीन मंजूर करूनही  संबंधित आरोपीला  क्षुल्लक तांत्रिक कारणावरून उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर येथील कारागृहातून तब्बल आठ महिने न सोडले जाण्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी उघड झाला. यामुळे संतापलेल्या उच्च न्यायालयाने या आरोपीला २४ तासांत तुरुंगातून मुक्त करण्याचा नवा आदेश दिला. त्याचे मात्र तत्परतेने पालन केले गेल व आता हा आरोपी तुरुंगातून सुटला आहे.

या आरोपीचे नाव विदोन बरुआर असे आहे. अटक केल्यावर रिमांड मागताना व रिमांड मिळाल्यानंतर त्यास तुरुंगात रवाना करताना पोलिसांनी त्याच्या नावाची नोंद ‘विनोद कुमार बरुआर’ अशी केली होती. विनोद याने सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. परंतु तो ४ सप्टेंबर, २०१९ रोजी फेटाळण्यात आला. नंतर उच्च न्यायालयाने त्यास ९ एप्रिल, २०२० रोजी जामीन मंजूर केला. या दोन्ही न्यायालयांमध्ये जामिनासाठी अर्ज करताना विनोद याने ‘विनोद बरुआर’ या नावाने अर्ज केले होते. उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यावर त्याजी जी ‘रीलिज ऑर्डर’ निघाली तीही ‘विनोद बरुआर’ याच नावाने निघाली. रिमांड ऑर्डरमधील नावात असलेला मधला ‘कुमार’ हा शब्द रीलिज ऑर्डरमध्ये नाही, असे कारण देत तुरुंग अधिकार्‍यांनी त्यास सोडण्यास नकार दिला.

यानंतर कुमारने नावामध्ये ‘कुमार’ हा शब्द घालून घेण्यासाठी सत्र न्यायालयाकडे अर्ज केला. परंतु उच्च न्यायालयाने दिलेल्या जामिनाच्या आदेशातही नावामध्ये ‘कुमार’ हा मधला शब्द नाही, असे सांगून सत्र न्यायालयाने नावात बदल करण्यास नकार दिला. मग विनोद पुन्हा उच्च न्यायालयात आला. झालेला प्रकार लक्षात आल्यावर उच्च न्यायालय चांगलेच संतापले. जामीन मिळालेली व्यक्ती तीच आहे याविषयी शंका घेण्याचे कोणतेही कारण नसूनही क्षुल्लक तांत्रिक खुस्पटे काढून विनोदला आठ महिने तुरुंगात बेकायदा डांबल्याबद्दल तुरुंग अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले.
नावात बदल करण्याची काही गरज नाही, सत्र न्यायालयाने ‘विनोद कुमार’ याच नावाने नवी ‘रीलिज ऑर्डर’ जारी करावी व  पुन्हा कोणत्याही सबबी न सांगता तुरुंगाधिकार्‍यांनी विनोदला २४ तासांत तुरुंगातून सोडावे, असा आदेश न्यायालयाने दिला.

त्यानुसार विनोदला सोडण्यात आले. आदेशाची अंमलबजावणी झाल्याचा अहवाल घेऊन सिद्धार्थनगर मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक राकेश सिंग स्वत: उच्च न्यायालयापुढे हजर राहिले. झाल्या प्रकाराबद्दल थारूर-मातूर कारणे देऊन त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. उच्च न्यायालयाने ती नाखुशीने स्वीकारली व  भविष्यात अधिक काळजीपूर्वक काम करण्याची तंबी सिंग यांना दिली.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER