कंगनावर नोंदलेल्या देशद्रोहाच्या गुन्ह्याविषयी हायकोर्ट साशंक आणखी दोन आठवडे सक्तीची कारवाई नाही

Bombay HC & Kangana Ranaut

मुंबई : समाजमाध्यमांत टाकलेल्या पोस्टबद्दल बॉलिवूड अभिनेत्री कंगना रराणावत आणि तिची बहीण रंगोली चंदेल यांच्याविरुद्ध वांद्रे पोलिसांनी नोंदविलेल्या देशद्रोहाच्या गुन्ह्याच्या कायदेशीरपणावर मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी पुन्हा एकदा साशंकता व्यक्त केली. या गुन्ह्याच्या अनुषंगाने या दोन्ही बहिणींविरुद्ध कोणताही सक्तीची कारवाई न करण्याचा आधीचा आदेश कायम ठेवत न्यायालयाने त्या दोघींना येत्या २५ जानेवारीपर्यंत चौकशीसाठी बोलाविण्यासही पोलिसांना मनाई केली.

साहिल अश्रफ अली सैयद यांनी केलेल्या फिर्यादीवर महानगर दंडाधिकाºयांनी दिलेल्या आदेशानुसार कंगना व रंगोली यांच्यावर वरीलप्रमाणे गुन्हा नोंदवून वांद्रे पोलीस तपास करीत आहेत. ती फिर्याद व त्यावर दंडाधिकाºयांनी दिलेला आदेश रद्द करावा यासाठ या दोन्ही बहिणींनी याचिका केली आहे. त्यावर न्या. संभाजी शिवाजी शिंदे व न्या. मनिष पितळे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली तेव्हा न्या, शिंदे यांनी वरीलप्रमाणे साशंकता बोलून दाखविली. गेल्या तारखेलाही न्यायमूर्तींनी हेच प्रथमदर्शनी मत व्यक्त केले होते.

कंगना व रंगोली यांनी ८ जानेवारी रोजी दु. १२ ते ३ या वेळात जाबजबाबांसाठी वांद्रे पोलिसांसमोर हजर व्हावे असे न्यायालयाने गेल्या तारखेला सांगितले होते. त्यानुसार दोघी हजर राहिल्या. पण व्यावसायिक काम आहे असे सांगून कंगना लवकर निघून गेली. याला तपासात सहकार्य देणे म्हणत नाहीत, असे पब्लिक प्रॉसिक्युटर दीपक ठाकरे यांनी म्हणाले.
त्यावर न्या, पितळे ठाकरे यांना म्हणाले की, कंगना दोन तास तेथे होती. तेवढे पुरेसा नाहीत का? तुमच्या मते ‘सहकार्या’साठी तिने आणखी किती तास थांबायला हवे होते ?  पोलिसांना कंगनाचे आणखी तीन दिवस जाबजबाब घ्यायचे आहेत, असे उत्तर ठाकरे यांनी दिले.

मूळ फिर्यादी सैयद यांच्या वकिलाने याचिकेला उत्तर दाखल करण्यासाठी वेळ देण्याची विनंती केली. त्यानुसार येत्या २५ जानेवारीस पुढील सुनावणी ठेवण्यात आली. सक्तीची कारवाई न करण्याचा आधी दिलेला आदेश तोपर्यंत लागू राहील व तोपर्यंत पोलिसांनी या दोघींना चौकशीसाठीही बोलावू नये, असे न्यायालयाने स्पष्ट केले. वांद्रे पोलिसांना इतरही बरेच काम़ आहे. दरम्यानच्या दिवसांत त्यांनी काम करावे, असा शेरा न्या. शिंदे यांनी मारला.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER