आई-वडिलांच्या तंट्यात भरडल्या जाणाऱ्या मुलीला हायकोर्टाचा दिलासा

Mumbai Hc & Court order
  • आईने दाखल केलेली कौटुंबिक हिंसाचाराची केस रद्द

मुंबई : वैवाहिक कलहातून आईने वडिलांविरुद्ध कौटुंबिक कलह कायद्यान्वये दाखल केलेल्या फौजदारी केसमुळे निष्कारण भरडल्या जात असलेल्या एका २३ वर्षांच्या होतकरू तरुणीला दिलासा देत उच्च न्यायालयाने आईने दाखल केलेली या मुलीपुरती केस रद्द केली आहे.

चार बंगला, अंधेरी (प.) येथील ‘म्हाडा’ वसाहतीत राहणार्‍या आणि अभियांत्रिकी पदवीधर असलेल्या विनिशा व्हिन्सेंट रॉड्रिक्स या तरुणीने केलेली याचिका मंजूर करून न्या. संभाजी शिवाजी शिंदे व न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला.

विनिशा वडिलांसोबत अंधेरी येथे राहते व तिची आई ज्योती व धाकटी बहीण पवई येथे वेगळ्या राहतात. ज्योतीने तिचे पती व्हिन्सेंट यांच्याविरुद्ध महिलांना कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण देणाऱ्या कायद्यान्वये (Protection of Women from Domestic Violence Act-DV Act) महानगर दंडाधिकारी न्यायालयात फौजदारी केस दाखल केली आहे. त्यात ज्योती यांनी पतीकडून दरमहा ८० हजार रुपये खावटी, वेगळे राहण्यासाठी भाड्याचे किंवा मालकीचे स्वतंत्र घर आणि ८५ लाख रुपयांच्या भरपाईचीही मागणी केली आहे. या खटल्यात ज्योतीने पतीसोबत विनिशा या आपल्या मुलीलाही आरोपी केले होते. खंडपीठाने खटल्यातून विनिशाचे नाव आरोपी म्हणून रद्द केले.

खंडपीठाने म्हटले की, सर्व तथ्यांचा विचार करता असे स्पष्ट दिसते की, ज्योती हिने पतीकडून होणाऱ्या कथित कौटुंबिक छळाचे जे आरोप केले आहेत त्याच्याशी विनिशा हिचा काहीही संबंध नाही. एकदा कधी तरी वडिलांच्या चिथावणीवरून विनिशाने आपल्याला मारहाण केली, असा एकमेव फुटकळ आरोप ज्योती हिने केलेला आहे. पण हा आरोपही तिने विनिशा वडिलांसोबत राहते या रागातून केलेला दिसतो. पण हा आरोप एवढा असंभवनीय आहे की त्यावर विश्वासही ठेवला जाऊ शकत नाही.

पतीवरील राग ज्योती हिने मुलीवरही काढल्याने आई-वडिलांच्या भांडणात त्यांची मुलगीही निष्कारण भडरली जात आहे, असा निष्कर्ष नोंदवत खंडपीठाने म्हटले की, विनिशाला उच्च शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाला जायची इच्छा आहे. पण आईने थिल्लर आरोपावरून दाखल केलेली ही फौजदारी केस विनिशाला ऑस्ट्रेलियाचा व्हिसा मिळण्यात अडथळा ठरत आहे. अशा प्रकारे मुलीचे भविष्य उज्ज्वल होण्यात तिच्या जन्मदात्या आईनेच खोडा घातला आहे.

ज्योतीने पतीविरुद्धच्या खटल्यात मुलीलाही आरोपी करणे हे न्यायप्रक्रियेचा दुरुपयोग करून तिला विनाकारण त्रास देणे आहे. त्यामुळे आम्ही विनिशाला न्याय देण्यासाठी तिच्याविरुद्धचा खटला रद्द करत आहोत, असे न्यायमूर्तींनी नमूद केले.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button