हायकोर्टाने कोकेन तस्कराची शिक्षा १८ वर्षांनी कमी केली

Drugs & Mumbai HC

मुंबई : कोकेन या अमली पदार्थाची तस्करी करताना मुंबई विमानतळावर पकडेलेल्या एका नायजेरियन तस्कराची कारावासाची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने अपिलात १८ वर्षांनी कमी केली. मुसा अब्दुल विमुमुनी केनेथ या नैरोबीहून मुंबईला आलेल्या नायजेरियन नागरिकास ९८०  ग्रॅम कोकोन पावडरची सामानात लपवून तस्करी करताना २० आॅगस्ट, २००९ रोजी कस्टम्स अधिकाºयांनी पकडले होते. अमलीपदार्थ विरोधी कायद्याखालील (NDPS Act) विशेष न्यायालयाने त्यास कोकेन जवळ बाळगणे व त्याची वाहतूक करणे अशा दोन गुन्ह्यांसाठी प्रत्येकी १५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. या दोन्ही शिक्षा स्वतंत्रपणे लागोपाठ भोगण्याचा आदेश दिला गेला होता. अशा प्रकारे केनेथ यास एकूण ३० वर्षांचा सश्रम कारावास भोगावा लागणार होता.

उच्च न्यायालयाने त्याचे अपील अंशत: मंजूर करताना त्याची प्रत्येक गुन्ह्याची शिक्षा १५ ऐवजी १२ वर्षे अशी कमी केली व या दोन्ही शिक्षा एकाच वेळी भोगण्याचा आदेश दिला. परिणामी केनेथ यास ३०ऐवजी १२ वर्षांची एकत्रित शिक्षा दिली गेली. म्हणजे त्याची शिक्षा १८ वर्षांनी कमी झाली. आतापर्यंत त्याची ११ वर्षे तीन महिने शिक्षा भोगून झाली आहे. त्यामुळे आणखी नऊ महिन्यांनी तो संपूर्ण शिक्षा भोगून तुरुंगातून सुटेल.

विशेष न्यायालयाने शिक्षा देताना दंड प्रक्रिया संहितेच्या कलम ३१ चे पालन केले नाही या कारणावरून उच्च न्यायालयाने हा निकाल दिला. या कलमान्वये एकाच खटल्यात एकाहून अधिक गुन्ह्यांसाठी झालेल्या शिक्षा स्वतंत्रपणे एका पोठोपाठ भोगण्याचा आदेश न्यायालय देऊ  शकते. मात्र अशा एकत्रित शिक्षा १४ वर्षांपेक्षा जास्त होता कामा नयेत व अशा एकत्रित शिक्षा त्यापैकी प्रत्येक गुन्ह्यासाठी दिल्या जाऊ शकणाºया कमाल शिक्षेच्या दुपटीहून जास्त होता कामा नयेत, अशी दोन बंधने त्यात आहेत. केनेथला शिक्षा देताना विशेष न्यायालयाने ही दोन्ही बंधने पाळली नव्हती. एक म्हणजे, त्याने पाठोपाठ भोगायच्या शिक्षा १४ वर्षांपेक्षा जास्त होत होत्या. दुसरे म्हणजे, दोषी ठरलेल्या प्रत्येक गुन्ह्यासाठी केनेथला १० वर्षांची कमाल शिक्षा दिली जाऊ शकत होती. म्हणजेच त्याने पाठोपाठ भोगायच्या शिक्षेचा एकत्रित कालावधी २० वर्षांपेक्षा जास्त असू शकत नव्हता. विशेष न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार तो ३० वर्षे होत होता.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER