उचकी – क्षुद्र ते गंभीर लक्षण उत्पन्न करणारी !

उचकी

उचकी येणे हा व्याधी आहे हा विचार देखील आपण कधी करीत नाही. उचकी लागली की काही वेळात अगदी साधे पाणी पिल्याने उपशय मिळतो म्हणून त्याचे कधी गांभिर्य जाणवत नाही. उचकी लागली असता बरेचवेळा काहीच न करताही शांत होते.आयुर्वेदात हिक्का / हिध्मा ( हिक् हिक् असा आवाज निर्माण होतो) म्हणजेच उचकी ही व्याधी मानली आहे. उचकी लागली की कुणीतरी आठवण काढली असे म्हटले जाते. पण उचकी लागण्याची अनेक कारणे आहेत.

घाईने जेवणे, अति तिखट खाणे, जळजळ उत्पन्न करणारे पदार्थ, उग्र मसालेदार पदार्थ, पचायला जड पदार्थ घाईने खाणे, अति थंड पदार्थ /पेय घेणे, घश्यात घास अडकणे तसेच अनेक गंभीर व्याधींचे कारण असू शकते. उदा. मज्जातंतुचे विकार, कॅन्सर, डायफ्रॅम विकार, यकृत विकार इ.

एकदाच येणारा उचकीचा आवाज वरचेवर येतो त्यामुळे त्रास होतो. झोप येत नाही व काही खाता येत नाही. जबरदस्ती खाल्यास ओकारी होते. मद्यपान जास्त झाल्यास अशी उचकी लागते.

बऱ्याचवेळा शारीरिक परीश्रम जास्त झाले की उचकी लागलेली असते. कष्टकारक नसते पण परीश्रम केले की पुन्हा वाढते. काही खाल्ले की शांत होते.

जेवणाच्या पचन काळात कधी कधी तीव्र उचकी येते. वांती, डोळ्यातून पाणी येणे, मान डोक्यात तीव्र कंपन अशी लक्षणे निर्माण होतात.

आधी सांगितल्याप्रमाणे बऱ्याच वेळा उचकीवर गरम पाणी पिणे किंवा काहीच न करताही उपशम मिळतो. शेकले तरी बरे वाटते. अजीर्णामुळे असेल तर गरम पाण्यासह काळं मीठ सैंधव लवंग हिरडा घेतले की पोट साफ होऊन उचकी थांबते. पिंपळी मध चाटण, सुंठगुळ घेणे हे सुद्धा फायदेशीर ठरते.

तोंडावर थंड पाणी शिंपडणे, रुग्णास घाबरविणे, अचंबित करणे, सत्य वा मिथ्या शोक समाचार वा आनंदाची बातमी देणे, चिमटा काढणे हे सुद्धा उचकी थांबविण्याचे उपाय आयुर्वेदात सांगितले आहे. सतत व न थांबणाऱ्या उचकीकरीता तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक ठरतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER