आपल्यापेक्षा छोट्या नायकांची नायिका बनणाऱ्या नायिका

Heroines.jpg

बॉलिवूडमध्ये नायिका ही नेहमी नायकाच्या वयापेक्षा छोटी असलेलीच घेतात यामुळे दोघांची जोडी चांगली दिसते असे निर्माता, दिग्दर्शकांना वाटते आणि प्रेक्षकांनाही अशी जोडी पाहण्यास आवडते. त्यामुळेच सलमान, अजय देवगण, आमिर खान, संजय दत्त, शाहरुख खान हे पन्नाशी पार केलेले नायक आपल्यापेक्षा निम्म्या वयाच्या नायिकेबरोबर रोमांस करताना दिसतात. बॉलिवूडचे असे प्रचलन सुरुवातीपासूनच असल्याने यात शक्यतो कोणी बद  करण्याचा प्रयत्न करीत नाही. परंतु गेल्या काही वर्षांपासून काही धाडसी निर्माते, दिग्दर्शक मोठ्या वयाच्या नायिकेबरोबर तिच्यापेक्षा वयाने छोट्या असलेल्या अभिनेत्याला नायक बनवू लागले आहेत. विशेष म्हणजे यापैकी काही जोड्या प्रेक्षकांना आवडल्याही आहेत. म्हणूनच कदाचित आगामी ‘अ सुटेबल बॉय’मध्ये चक्क ५० वर्षांच्या तब्बूबरोबर तिच्यापेक्षा २६  वर्षांनी लहान असलेल्या २४ वर्षांच्या ईशान खट्टरची जोडी जमवण्यात आली आहे. विशेष म्हणजे या दोघांमध्ये अनेक रोमँटिक प्रसंगही या मालिकेत दाखवण्यात येणार आहेत. यापूर्वीही अनेक चित्रपटांत अशा जोड्या समोर आल्या आहेत.

आपल्यापेक्षा कमी वयाच्या नायकाबरोबर काम करणाऱ्या नायिकांमध्ये ऐश्वर्या रायचा क्रमांक फार वरचा लागू शकतो. तिने आपल्या कारकिर्दीत तिच्यापेक्षा वयाने छोट्या असलेल्या अनेक नायकांबरोबर काम केले आहे. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फ़न्ने खान’ चित्रपटात ऐश्वर्या रायने आपल्यापेक्षा ११ वर्षे लहान असलेल्या राजकुमार रावच्या नायिकेची भूमिका साकारली होती. त्यापूर्वी २०१६ मध्येही ऐश्वर्याने करण जोहरच्या ‘ऐ दिल हैं मुश्किल’ मध्ये तिच्यापेक्षा नऊ  वर्षांनी लहान असलेल्या रणबीर कपूरच्या नायिकेची भूमिका साकारली होती. दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडली होती. चित्रपटात दोघांची रोमँटिक दृश्येही मोठ्या प्रमाणावर होती. त्यानंतर ‘धूम-२’ मध्ये हृतीक रोशनचीही ती नायिका झाली होती.  हृतीक  हा ऐश्वर्यापेक्षा वयाने लहान आहे. परंतु या दोघांची केमिस्ट्रीही पडद्यावर चांगलीच रंगली होती. एवढेच नव्हे तर ऐश्वर्याने हृतीकसोबत किसिंग सीनही दिला होता. ऐश्वर्याने तिच्यापेक्षा वयाने  लहान असलेल्या एक्स-बॉयफ्रेंड विवेक ओबेरॉयसोबत ‘क्यूं हो गया ना’ चित्रपट  केला होता. तर नंतर पती  झालेल्या अभिषेक बच्चनसोबतही ऐश्वर्याने रावण, कुछ ना कहो, गुरु, उमराव जान, ढाई अक्षर प्रेम के- असे अनेक चित्रपट केले आहेत. विशेष म्हणजे अभिषेक ऐश्वर्यापेक्षा दोन ते तीन वर्षांनी लहान आहे.

यानंतर कॅटरीना कैफचे नाव घेता येईल. कॅटरीनानेही तिच्यापेक्षा एक वर्षाने लहान असलेल्या सिद्धार्थ मल्होत्राची नायिका म्हणून ‘बार बार देखो’ चित्रपट केला. तर दोन वर्षांनी लहान असलेल्या आदित्य रॉय कपूरची ‘फितूर’ या चित्रपटात ती नायिका झाली होती.

नर्गिस फाखरीने तर तिच्यापेक्षा तीन वर्षे  लहान असलेल्या शाहीद कपूरची नायिका म्हणून ‘रॉकस्टार’मधून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता. यानंतर तिच्यापेक्षा आठ  वर्षांनी लहान असलेल्या वरुण धवनसोबत ‘मैं तेरा हीरो’ चित्रपट तिने केला होता. चित्रपटात दोघांची अनेक रोमँटिक दृश्ये होती. ‘जुडवा-२’  मध्ये आपल्यापेक्षा दोन वर्षांनी लहान असलेल्या वरुण धवनची नायिका म्हणून जॅकलीन फर्नांडिसने काम केले. तर ‘अ फ्लाईंग जट’मध्ये तिच्यापेक्षा पाच वर्षांनी  लहान असलेल्या टायगर श्रॉफची ती नायिका झाली होती.

‘उड़ता पंजाब’मध्ये करीना कपूरने तिच्यापेक्षा तीन वर्षे लहान असलेल्या दिलजित दोसांजच्या नायिकेची भूमिका साकारली होती. ‘गोरी तेरे प्यार में’ आणि ‘एक मैं और एक तू’ चित्रपटात करीनाने तिच्यापेक्षा तीन वर्षे लहान असलेल्या इमरान खानच्या नायिकेची भूमिका साकारली होती.

विद्या बालननेही ‘बॉबी जासूस’ चित्रपटात तिच्यापेक्षा आठ वर्षे लहान असलेल्या अली फजलच्या नायिकेची भूमिका साकारली होती. ‘द डर्टी पिक्चर’, ‘घन चक्कर’ आणि ‘हमारी अधुरी कहानी’ चित्रपटात विद्याने तिच्यापेक्षा एक वर्षाने लहान असलेल्या इमरान हाशमीच्या नायिकेची भूमिका साकारली आहे. तर ‘किस्मत कनेक्शन’मध्ये विद्याने तिच्यापेक्षा तीन वर्षांनी लहान असलेल्या  शाहिद कपूरच्या नायिकेची भूमिका साकारली होती. परंतु प्रेक्षकांना ही जोडी काही आवडली
नव्हती.

प्रियंका चोप्राने तिच्यापेक्षा तीन वर्षांनी लहान असलेल्या रणवीर सिंह आणि  अर्जुन कपूरसोबत ‘गुंडे’ चित्रपट केला होता. बाजीराव मस्तानीमध्येही ती रणवीरची नायिका झाली होती. मोठ्या वयाच्या नायिकांनी लहान वयाच्या नायकांबरोबर जोडी जमवली की त्यांचे करिअर आणखी काही वर्षे पुढे चालू राहते. त्यामुळे कदाचित नायिका आपल्यापेक्षा छोट्या वयाच्या नायकाबरोबर काम करण्यास होकार देतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER